बाय-बाय Nokia! कंपनीने घेतला मोठा निर्णय; पुन्हा बंद होणार नोकिया फोन? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 04:23 PM2024-02-01T16:23:31+5:302024-02-01T16:25:18+5:30
नोकिया फोन्स बनवणाऱ्या HMD Global कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Nokia HMD Global : काही वर्षांपूर्वी मोबाईल मार्केटमध्ये NOKIA चे राज्य होते. पण, कालांतराने स्मार्टफोन्सच्या शर्यतीत अनेक कंपन्या उतरल्याने नोकिया मागे पडली. अलीकडच्या काही वर्षात नोकियानेस्मार्टफोन्स मार्केटमध्ये पुनरागमन केले, पण हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता नोकियाचे डिव्हाईस बनवणाऱ्या HMD Global कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे.
एचएमडी ग्लोबल आता त्यांच्या मूळ ब्रँड, म्हणजेच HMD Global नावाने स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनी गेल्या काही काळापासून कंपनीकडून याचे संकेत दिले जात होते. आता HMD ने नोकिया ब्रँड त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट X वरून काढून टाकला आहे. कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल, जो एचएमडी ब्रँडिंगसह येईल. हा स्मार्टफोन लवकरच सुरू होणाऱ्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2024) मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
We're HMD, the makers of Nokia phones – among other things. 💫
— HMD (@HMDglobal) January 31, 2024
You've probably noticed a few changes around here. We’ve got a new look, but some things will stay the same. Watch this space. More news coming very soon. 👀https://t.co/qDvbbhnEjnhttps://t.co/qDvbbhnEjn
नोकिया बंद होणार?
नोकिया पुन्हा एकदा बंद पडणार का, असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे. यापूर्वी मायक्रोसॉफ्टनेही नोकियाचे फोन्स विकले होते, मात्र नंतर कंपनीने नोकिया ब्रँडचे हक्क एचएमडी ग्लोबलला विकले. आता परत नोकिया स्मार्टफोन बंद होणार, असे नाही. कंपनीने स्पष्ट केले आहे की, ते नोकियाचे फोनदेखील बनवत राहतील. पण, कंपनी नवीन ब्रँडच्या नावाने व्यवसाय करेल. कंपनीची नवीन वेबसाइट hmd.com वर तुम्हाला नोकिया फोन्स मिळतील.
कंपनीचे नियोजन काय आहे?
कंपनीने सांगितले की, ते मूळ कंपनी एचएमडी ब्रँडिंग वाढवण्यावर भर देत आहे. लवकरच कंपनीचा नवीन स्मार्टफोन येणार आहे. पण, एचएमडी ग्लोबलच्या या स्मार्टफोनबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. कंपनीने जारी केलेल्या टीझरनुसार, हा हँडसेट ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. याचे डिझाइन मायक्रोसॉफ्ट लुमियाप्रमाणे असू शकते.