नोकियाच्या मॉडेल्सला मिळणार फेस अनलॉक फिचर
By शेखर पाटील | Published: July 11, 2018 05:45 PM2018-07-11T17:45:03+5:302018-07-11T17:48:36+5:30
नोकिया ब्रँडच्या चार मॉडेल्सला लवकरच फेस अनलॉक हे फिचर अपडेटच्या स्वरूपात मिळणार
एचएमडी ग्लोबल कंपनीची मालकी असणार्या नोकिया ब्रँडच्या चार मॉडेल्सला लवकरच फेस अनलॉक हे फिचर अपडेटच्या स्वरूपात मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
अलीकडच्या काळात उच्च श्रेणीच नव्हे तर अगदी मिड रेंजमधील तर काही किफायतशीर मूल्याच्या मॉडेल्समध्येही फेस अनलॉक हे फिचर देण्यात येत आहे. विशेष करून बहुतांश चीनी कंपन्यांनी आपल्या बजेट मॉडेल्समध्ये हे फिचर्स दिले आहे. अर्थात आज फेस अनलॉक फिचरचा वापर वाढत असल्याची बाबदेखील याला कारणीभूत आहे. या पार्श्वभूमीवर, लवकरच नोकियाच्या चार स्मार्टफोन्समध्ये फेस अनलॉक फिचर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नोकिया ८, नोकिया ८ सिरोक्को, नोकिया ७ प्लस आणि नोकिया ६ या मॉडेल्समध्ये येत्या काही दिवसांमध्ये फेस अनलॉक करण्याची सुविधा मिळणार आहे.
आयफोन-एक्समधील फेस आयडी तंत्रज्ञानानंतर अँड्रॉइड प्रणालीत फेस अनलॉक फिचरचा वापर वाढला आहे. विशेष करून आयफोनप्रमाणेच आता अँड्रॉइडमध्येही हे फिचर अतिशय सुरक्षित पध्दतीत वापरता येत आहे. या पार्श्वभूमीवर, नोकियानेही आपल्या युजर्सला ही सुविधा देण्याचे ठरविले आहे. काही युजर्सने याबाबत नोकिया कंपनीकडे केलेल्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. याला दिलेल्या उत्तरात कंपनीने नोकिया ८, नोकिया ८ सिरोक्को, नोकिया ७ प्लस आणि नोकिया ६ या मॉडेल्सला ओटीए अपडेटच्या माध्यमातून फेस अनलॉकची सुविधा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एचएमडी ग्लोबल कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपल्या याच मॉडेल्समध्ये अँड्रॉइडच्या ओरियो या अद्ययावत आवृत्तीचे अपडेट देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या पाठोपाठ आता ग्राहकांना फेस अनलॉकची सुविधादेखील मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.