लवकरच येणार नोकियाचा स्मार्ट स्पीकर
By शेखर पाटील | Published: August 22, 2018 11:23 AM2018-08-22T11:23:17+5:302018-08-22T11:23:52+5:30
नोकिया लवकरच स्मार्ट स्पीकर लाँच करणार असून या कंपनीने सादर केलेल्या एका टीझरच्या माध्यमातून ही माहिती जगासमोर आली आहे.
नोकिया लवकरच स्मार्ट स्पीकर लाँच करणार असून या कंपनीने सादर केलेल्या एका टीझरच्या माध्यमातून ही माहिती जगासमोर आली आहे. अलीकडे व्हाईस कमांडच्या (ध्वनी आज्ञावली) माध्यमातून वापरण्यात येणार्या उपकरणांच्या संख्येत वाढ झाली आहे. बहुतांश कंपन्यांनी आधी या स्वरूपाचे व्हर्च्युअल डिजिटल असिस्टंट सादर केले. तर नंतर यावर आधारीत विविध उपकरणे लाँच केली. सध्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये या प्रकारातील डिजिटल असिस्टंट प्रदान करण्यात आले आहेत. यासोबत याचा स्मार्ट स्पीकरमधील वापर आता प्रचलीत होत आहे. प्रारंभी अमेझॉनने इको या मालिकेत विविध मॉडेल्स सादर केले. यामध्ये अमेझॉननेच विकसित केलेल्या अलेक्झा या डिजिटल व्हर्च्युअल असिस्टंटवर आधारित डिजीटल असिस्टंटचा सपोर्ट देण्यात आला आहे. यानंतर गुगलने आपल्या गुगल असिस्टंटचा सपोर्ट असणारी होम ही मालिका सादर केली. अॅपलने आपल्या सिरी या असिस्टंटवर आधारित होमपॉड बाजारपेठेत उपलब्ध केले आहेत. सॅमसंगनेही अलीकडेच आपल्या बिक्सबी या असिस्टंटचा सपोर्ट असणारे स्मार्ट स्पीकर सादर केले आहेत. तर यानंतर काही अन्य कंपन्यांनीही स्मार्ट स्पीकर लाँच केले आहेत. यात आता एचएमडी ग्लोबल कंपनीची मालकी असणार्या नोकियाचाही समावेश असेल असे स्पष्ट झाले आहे.
नोकिया कंपनीने वेईबो या चिनी सोशल नेटवर्किंग साईटवर एक टीझर सादर केला असून यात स्मार्ट स्पीकर लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. हा टीझर एका जीआयएफ अॅनिमेशनच्या स्वरूपात सादर करण्यात आला आहे. यात ध्वनी आज्ञावलीवर चालणार्या एका आयताकृती उपकरणाची झलक दर्शवण्यात आली आहे. वास्तविक पाहता बाजारपेठेत उपलब्ध असणारे सर्व स्मार्ट स्पीकर हे गोलाकार वा लंब गोलाकार अकाराचे असतांना नोकियाचा स्पीकर हा वेगळ्या आकारमानाचा असू शकतो. दरम्यान, हे मॉडेल गुगल असिस्टंटवर चालणारे असेल असे मानले जात आहे. तर एका लीकनुसार नोकिया विकी हा स्वत:चा व्हर्च्युअल डिजिटल असिस्टंट विकसित करत असून हा स्मार्ट स्पीकरही यावर चालणारा असणार आहे.