वनप्लस सोडल्यानंतर Carl Pei सादर करणार Nothing Phone 1; लाँच होण्याआधीच फीचर्स झाले लीक
By सिद्धेश जाधव | Published: May 5, 2022 12:41 PM2022-05-05T12:41:30+5:302022-05-05T12:42:06+5:30
Nothing Phone 1 चे सर्व स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीचा ऑनलाइन लीक झाले आहेत. हा फोन 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केला जाईल.
Carl Pei यांनी वनप्लस सोडल्यानंतर Nothing ही कंपनी स्थापन केली होती. या कंपनी अंतर्गत पारदर्शक डिजाईन असलेले इयरबड्स सादर करण्यात आले होते. परंतु ग्राहक स्मार्टफोनची वाट बघत होते. काही दिवसांपूर्वी Nothing Phone 1 ची घोषणा करण्यात आली आणि हा फोन Flipkart वर देखील लिस्ट करण्यात आला आहे. आता या हँडसेटचे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच ऑनलाईन लीक झाले आहेत.
Nothing Phone 1 चे संभाव्य स्पेक्स
एका टिपस्टरनं दिलेल्या माहितीनुसार, Nothing Phone 1 मध्ये 6.43 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनचा डिस्प्ले HDR10+ सपोर्टसह येऊ शकतो. हा फोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरसह येईल, ज्यात 8GB पर्यंत RAM मिळू शकतो. सोबत 128GB स्टोरेज मिळू शकते. हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित Nothing OS वर चालेल.
या फोनचा कॅमेरा सेगमेंट पाहता, फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल. त्याचबरोबर 8MP ची वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो. Nothing Phone 1 मध्ये 4,500mAh ची बॅटरी मिळेल. विशेष म्हणजे या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग दिली जाऊ शकते.
टिपस्टरनं ही माहिती Amazon वर उपलब्ध असलेल्या Nothing Phone 1 च्या युजर मॅन्युअलमधून दिली आहे. परंतु Nothing Phone 1 ची किंमत मात्र लीक झालेली नाही. फोनचे फीचर्स पाहता हा डिवाइस 30 ते 35 हजारांच्या आत सादर केला जाऊ शकतो. तसेच हा डिवाइस तिसऱ्या तिमाहीत ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो.