आता तब्बल ८-के क्युएलईडी टीव्हीची एंट्री !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 11:25 AM2018-08-31T11:25:54+5:302018-08-31T11:26:23+5:30
सॅमसंग कंपनीने ८-के रेझोल्युशन क्षमता असणारा जगातील पहिला क्युएलईडी या प्रकारातील टीव्ही सादर केला असून याचे अनावरण करण्यात आले आहे. दिवसेंदिवस टीव्हीची रेझोल्युशन क्षमता वाढत चालल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
सॅमसंग कंपनीने ८-के रेझोल्युशन क्षमता असणारा जगातील पहिला क्युएलईडी या प्रकारातील टीव्ही सादर केला असून याचे अनावरण करण्यात आले आहे. दिवसेंदिवस टीव्हीची रेझोल्युशन क्षमता वाढत चालल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आता फोर-के क्षमतेचे टीव्ही संच प्रचलित झाले आहेत. तर काही कंपन्यांनी यापेक्षा दुप्पट म्हणजे ८-के क्षमतेच्या मॉडेल्सवर लक्ष केंद्रीत केले आहे. या अनुषंगाने बर्लीन शहरात सुरू होणार्या आयएफए-२०१८ या टेकफेस्ट आधी सॅमसंगने क्यु९००आर क्युएलईडी ८-के हे मॉडेल सादर केले आहे. आधी बाजारपेठेत ८-के क्षमतेचे टिव्ही असले तरी हे मॉडेल क्युएलईडी या प्रकारातील पहिले आहे. नावातच नमूद असल्यानुसार यामध्ये ८-के रेझोल्युशन क्षमतेचा डिस्प्ले असून हे मॉडेल क्युएलईडी (क्वाँटम डॉट एलईडी) या प्रकारातील आहे.
हे मॉडेल फुल एचडीपेक्षा १६ तर फोर-के क्षमतेपेक्षा चार पटीने अधिक सुस्पष्ट असणार आहे. अर्थात, अन्य टीव्हींपेक्षा या प्रकारातील मॉडेल्समध्ये अतिशय सजीव अशा चलचित्रांचा आनंद घेता येणार असल्याची बाब येथे लक्षात घेण्याजोगी आहे. सध्या निवडक कंपन्या क्युएलईडी डिस्प्लेचा वापर करत आहेत. सॅमसंगचा प्रस्तुत टीव्ही हा याच प्रकारातील आहे. यात एचडीआर १० + या तंत्रज्ञानाचा सपोर्ट देण्यात आला आहे. यात अँबिअंट लाईट मोड दिलेला असून हे मॉडेल बंद असतांना यावर आर्टवर्क अथवा फ्रेम्स दर्शविता येणार आहेत. तर याला अतिशय दर्जेदार अशा ध्वनी प्रणालीची जोड देण्यात आलेली आहे.
या टीव्हीच्या मॉडेलमध्ये ८-के म्हणजे तब्बल ७६८० बाय ४३२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. याच्या मदतीने अतिशय सुस्पष्ट अशा प्रतिमा आणि चलचित्र यावर पाहता येणार आहेत. यात अगदी सुक्ष्म बाबीदेखील अतिशय ठळकपणे पाहता येणार असल्यामुळे यावरून मिळणारी दृश्यानुभूती ही अफलातून असणार आहे. ६५, ७५, ८२ आणि ८५ इंच आकारमानाच्या पर्यायांमध्ये हा टिव्ही बाजारपेठेत उपलब्ध केला जाणार आहे. याचे मूल्य आणि उपलब्धता याबाबत सॅमसंगने अद्याप माहिती दिलेली नाही. तथापि, याबाबत कंपनीतर्फे लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे