आता फेसबुक मॅसेंजरवर दिसतील जाहिराती
By शेखर पाटील | Published: July 24, 2017 12:16 PM2017-07-24T12:16:51+5:302017-07-25T16:31:42+5:30
फेसबुक मॅसेंजरवर आता जाहिराती दिसणार असून या माध्यमातून मॅसेंजरचा व्यावसायिक उपयोग सुरू झाला आहे.
फेसबुक मॅसेंजरवर आता जाहिराती दिसणार असून या माध्यमातून मॅसेंजरचा व्यावसायिक उपयोग सुरू झाला आहे.
फेसबुक मॅसेंजरचे १.२ अब्ज सक्रीय युजर्स आहेत. आधीच फेसबुकने मॅसेंजरचा वापर करून विविध कंपन्यांना आपल्या ग्राहकांशी मर्यादीत प्रमाणात संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा काही कंपन्या चांगला वापर करत आहेत. आता याच कंपन्या आपल्या ग्राहकांना मॅसेंजरवरून जाहिराती पाठवू शकणार आहेत. याआधी फेसबुकने काही कंपन्यांच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया, थायलंड आदी देशांमध्ये याची चाचणी घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर आज फेसबुक मॅसेंजरचे प्रॉडक्ट हेड स्टॅन चुडनोव्हस्की यांनी लवकरच मॅसेंजरवरील जाहिरातींची सुविधा अधिकृतपणे सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मॅसेंजरवर आधीच पेमेंट सिस्टीम लागू करण्यात आली आहे. तर भारतात युपीआयवर आधारित प्रणाली येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमिवर जाहिरातींच्या माध्यमातून मॅसेंजरचा व्यावसायिक वापर सुरू होणार आहे. यामुळे आगामी काळात एखाद्या हेल्पलाईन वा ई-मेलप्रमाणे कंपन्या आपल्या ग्राहकांना वेळोवेळी आवश्यक असणारी माहिती तसेच अलर्ट आणि याचसोबत जाहिरातीदेखील मॅसेंजरवरून पाठवू शकतील. मात्र यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे कुणीही अनोळखी युजर्सला व्यावसायिक संदेश पाठवू शकणार नाही. म्हणजेच आधी चॅटींग करण्यात आलेल्या खाते धारकांनाच या माध्यमातून जाहिराती पाठवता येतील. महत्वाची बाब म्हणजे ग्राहकांना या जाहिराती त्रासदायक ठरत असल्यास त्या न पाहण्याची/ब्लॉक करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.