आता घटस्फोटाच्या मदतीसाठी डायव्होर्सकार्ट अॅप
By शेखर पाटील | Published: November 27, 2017 01:19 PM2017-11-27T13:19:19+5:302017-11-27T13:21:09+5:30
देशातील घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर आता डायव्होर्सकार्ट या नावाने स्वतंत्र अॅप सादर करण्यात आले असून यात एकमेकांपासून काडीमोड हवा असणार्या जोडप्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.
सध्या देशातील सर्वात चिंताजनक विषय म्हणजेच घटस्फोट होय. जवळपास प्रत्येक समाजात याचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले आहे. कुणाही दाम्पत्याला घटस्फोट हवा असल्यास त्याला सध्या तरी वकिलाकडे जाऊन कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. मात्र आजच्या आधुनिक युगात सर्वच घटक स्मार्ट होत असतांना याला घटस्फोटही अपवाद कसा राहणार ? नेमकी हीच बाब लक्षात घेत वंदना शहा या विख्यात महिला विधिज्ज्ञाने डायव्होर्सकार्ट या नावाने स्वतंत्र अॅप सादर केले आहे.
शहा या स्वत: घटस्फोटात स्पेशालिटी असणार्या वकील म्हणून ओळखल्या जातात. त्या वर्तमानपत्रांमधील लेखांच्या माध्यमातून घटस्फोटाबाबत माहितीसुद्धा वेळोवेळी देत असतात. मात्र डायव्होर्सकार्टच्या माध्यमातून त्या थेट काडीमोड करण्यासाठी इच्छुक असणार्या स्त्री-पुरूषांना थेट त्यांच्या स्मार्टफोनवरच याबाबत सखोल मार्गदर्शन करणार आहेत. यात घटस्फोटाबाबत विद्यमान कायदेशीर तरतुदींसह संबंधित व्यक्तीच्या अधिकारांच्या माहितीचा समावेश आहे.
यातून कुणालाही घटस्फोट घेण्यासाठी क्रमाक्रमाने नेमके काय करावे? याची माहिती देण्यात येणार आहे. हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात आले आहे. सध्या तरी यातील माहिती ही इंग्रजीतून असून लवकरच याचा अन्य भाषांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
वंदना शहा यांनी नुकतेच हे अॅप सादर केले. याप्रसंगी स्वत:च्या आयुष्यात घटस्फोटांना सामोरे जावे लागणारे अनेक मान्यवर उपस्थित होते. याच्या माध्यमातून कुणालाही अगदी अष्टौप्रहर म्हणजेच २४*७ या प्रकारात मोफत माहिती देण्यात येणार आहे. यात ज्येष्ठ विधिज्ज्ञांकडून रिअल टाईम या पद्धतीत मिळणार्या मार्गदर्शनाचा समावेश आहे. तथापि, हे फक्त मार्गदर्शन करणारे अॅप असून संबंधीत जोडप्यांना यातून माहिती मिळवून प्रत्यक्षात न्यायालयात जाण्याची प्रक्रिया स्वत:लाच करावी लागणार असल्याचेही शहा यांनी स्पष्ट केले आहे. अर्थात याआधी हे अॅप घटस्फोट प्रक्रियेतील सर्व बारकावे संबंधीतांना सांगणार आहे.