आता मशरूमपासूनही बनणार कॉम्प्युटर चिप, पुनर्प्रक्रिया करता येत असल्याने पर्यावरणाचेही रक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 11:19 AM2022-11-20T11:19:58+5:302022-11-20T11:21:02+5:30
जगभरात प्लॅस्टिक आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या प्रश्नानेही भयंकर स्वरूप धारण केले आहे. कॉम्प्युटर चिप व बॅटरी बनविण्यासाठी प्लॅस्टिकचा उपयोग केला जातो.
व्हिएन्ना : मशरूमपासून आता कॉम्प्युटर चिप बनविण्याचे तंत्र ऑस्ट्रियामधील जोहानस केपलर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. मशरूमच्या आवरणापासून इलेक्ट्राॅनिक सबस्ट्रेट तयार करण्यात आलेला आहे. सर्किटच्या सर्वात तळाच्या स्तराला सबस्ट्रेट म्हटले जाते. तो विद्युतपुरवठा ट्रान्सफर करणाऱ्या धातू घटकांना थंड राखण्याचे व इन्सुलेट करण्याचे काम करतो.
जगभरात प्लॅस्टिक आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या प्रश्नानेही भयंकर स्वरूप धारण केले आहे. कॉम्प्युटर चिप व बॅटरी बनविण्यासाठी प्लॅस्टिकचा उपयोग केला जातो. मात्र, या घटकांवर पुनर्प्रक्रिया करणे शक्य होत नव्हते. मात्र, आता शास्त्रज्ञांनी या प्लॅस्टिकवर पुनर्प्रक्रिया करता येईल, अशी नवी पद्धती शोधून काढली आहे.
गॅनोडर्मा लुसिडम मशरूम ही एक प्रकारची बुरशी आहे. हे मशरूम आपल्या वाढीसाठी मायसेमेलिस या घटकापासून बनलेले आवरण स्वत:भोवती तयार करते. या आवरणाचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. त्यात असे आढळून आले की, ते लवचीक व चांगल्या दर्जाचे इन्सुलेटर असून इलेक्ट्रिक सर्किटमध्ये चांगल्या प्रकारे काम करते.
प्रदूषण टाळता येणे शक्य -
- मशरूमच्या चिपचा वियरेबल सेन्सर, रेडिओ टॅग अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कमी कालावधीसाठी वापर केला जातो.
- मशरूमपासून बनलेली असल्याने या चिपवर पुनर्प्रक्रियादेखील करता येईल. त्यामुळे प्रदूषणही होणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.