बापरे! किती ती भूक, भारतीयांनी एका महिन्यात १० अब्ज जीबी डेटा संपवला; Jio कडे पाहून जग हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 04:39 PM2023-04-23T16:39:06+5:302023-04-23T16:39:26+5:30
अवघे जग पाहत राहिले... दोन वर्षांपूर्वी कित्येक देशांनी फाईव्ह जी सुरु केले होते, पण एवढा वापर....
एखादा देश किती इंटरनेट वापरत असेल, ते पण जर फाईव्हजीचा भन्नाट स्पीड अद्याप सगळीकडे मिळालेला नसताना. १० एक्साबाईट... म्हणजेच १० अब्ज जीबी? होय जिओच्या इतिहासातच नाही तर सर्व टेलिकॉम कंपन्यांनी वर्षभर मिळून कधी एवढा आकडा पार केला नव्हता, तेवढा आकडा जिओच्या युजर्सनी एकाच महिन्यात पार करून दाखविला आहे.
२०१६ मध्ये जिओची एन्ट्री झाली होती. तेव्हा संपूर्ण देशाचा इंटरनेट वापर हा 4.6 एक्साबाइट वर्षाला एवढा होता. परंतू, आता पहिल्यांदाच एखाद्या महिन्यात १० एक्साबाईट एवढा डेटा वापरला गेला आहे. मार्च तिमाहीत जिओ नेटवर्कवर एवढा डेटा वापरला गेला की त्याचा आकडा 30.3 एक्साबाइट एवढा होता. याचा अर्थ महिन्याला १०.१ एक्साबाईट सरासरी डेटा वापरला गेला आहे.
जिओने आता बहुतांश शहरांत फाईव्ह जी रोलआऊट केले आहे. यामुळे याचा परिणाम डेटा वापरण्यावर झाला आहे. जिओच्या नेटवर्कवर मुंबई,पुणे सारख्या शहरांत १.२ जीबी पीएसचा वेग, तर फलटणसारख्या शहरात ५०० ते ७०० एमबीपीएसएवढा वेग मिळत आहे. युजर्सना सध्या ट्रायल बेसिसवर अनलिमिटेड डेटा दिला जात आहे. याचा परिणाम या डेटा वापरावर झाला आहे.
जिओचा एक युजर सरासरी महिन्याला 23.1 जीबी डेटा वापरत आहे. दोन वर्षांपूर्वी हाच वापर १३.३ जीबीपर्यंत होता. म्हणजेच युजर महिन्याला १० जीबीचा अतिरिक्त डेटा वापरू लागला आहे. हा आकडा टेलिकॉम इंडस्ट्रीच्या सरासरीपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.
तिमाही रिझल्टनुसार जिओने मार्च २०२३ पर्यंत साठ हजार साईट्सवर 3.5 लाखांहून अधिक ५जी सेल्स लावले आहेत. यामुळे देशभरातील 2,300 हून अधिक शहरे आणि गावांमध्ये फाईव्ह जी कव्हरेज मिळू लागले आहे. मोठ्या प्रमाणावर जिओचे युजर फाईव्ह जीचा वापर करू लागले आहेत. जगभरात अशाप्रकारे कोणत्याच कंपनीकडे फाईव्ह जी वापराचे रेकॉर्ड नाहीय.