अलर्ट! 1 फोन कॉल, 3 महिने अन् 7 कोटींची फसवणूक; 'असा' घातला कोट्यवधींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 03:12 PM2024-02-18T15:12:18+5:302024-02-18T15:12:55+5:30
एका महिलेची एक, दोन लाखांची नव्हे तर तब्बल साडेसात कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली. ईडी आणि मुंबई क्राइम ब्रँचच्या नावावर ही फसवणूक करण्यात आली होती.
सायबर क्रिमिनल्स दररोज लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहेत. अशी प्रकरणं दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. राजस्थानमधील झुंझुनूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची एक, दोन लाखांची नव्हे तर तब्बल साडेसात कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली. ईडी आणि मुंबई क्राइम ब्रँचच्या नावावर ही फसवणूक करण्यात आली होती.
साधारण तीन महिने महिलेची फसवणूक सुरूच होती. महिलेकडे असलेले पैसे संपले तेव्हा तिने 80 लाखांचं कर्ज काढून पैसे पाठवले. ही संपूर्ण घटना अत्यंत धक्कादायक आहे. पीडित महिला पिलानी येथील रहिवासी आहे. ती प्रायव्हेट जॉब करते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तिला एक कॉल आला, ज्यावर महिलेला सांगण्यात आलं की तिच्या आधार कार्डशी दुसरा मोबाईल नंबर लिंक झाला आहे. त्या क्रमांकावरून बेकायदेशीर जाहिराती आणि त्रासदायक मेसेज पाठवण्यात आले आहेत.
कॉलरने महिलेला सांगितलं की मुंबई पोलीस तिच्यावर कारवाई करणार आहेत. हे ऐकून महिला घाबरली. यानंतर आणखी एक कॉल आला, ज्यामध्ये कॉलरने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा संदर्भ दिला होता. दरम्यान, एका व्यक्तीने मुंबई पोलिसांचा एसआय असल्याचं सांगितलं. तुमच्या अडचणी वाढल्या आहेत, असे त्याने महिलेला सांगितले. मनी लाँड्रिंग प्रकरणात तुमचं नाव समोर आलं आहे, ज्यामध्ये 20 लाख रुपयांचा व्यवहार झाला होता. हे प्रकरण ईडीपर्यंत पोहोचले आहे.
अनेक गोष्टी सांगितल्यानंतर कॉलरने महिलेला स्काईपद्वारे ऑनलाइन मीटिंग घेण्यास सांगितलं. हा सर्व प्रकार ऐकून महिलेला धक्काच बसला. ती खूप घाबरली आणि दबावाखाली आली. यानंतर त्या लोकांनी महिलेला धमक्या देण्यास सुरुवात केली. धाक दाखवून ऑक्टोबर 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत महिलेची सुमारे 7 कोटी 67 लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूक करणाऱ्यांनी हे पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले होते.
घाबरलेली महिला पैसे पाठवत राहिली. आपल्या अटकेमुळे ती महिला इतकी घाबरली होती की तिने आयुष्यभराची कमाई तर दिलीच, पण बँकांकडून कर्ज घेऊन आणखी 80 लाख रुपये दिले. ठगांनी महिलेला सुप्रीम कोर्टात मनी लाँड्रिंग प्रकरण निकाली काढा आणि डिजिटल व्हेरिफिकेशननंतर पैसे परत करणार असंही सांगितले होते. त्यासाठी त्यांनी 12 फेब्रुवारीची तारीख दिली होती, मात्र त्यानंतर 15 फेब्रुवारीपर्यंत महिलेचा त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.