"वनप्लसचा फोन म्हणजे डेथ सर्टिफिकेट"; खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 03:44 PM2021-09-10T15:44:00+5:302021-09-10T15:50:46+5:30
Oneplus nord 2 5g blasted : अवघ्या दहा दिवसांपूर्वी वनप्लसचा नवा फोन घेतला होता. मात्र अचानक काम करत असताना त्याच्या खिशातून धूर आला आणि फोनचा मोठा स्फोट झाला.
नवी दिल्ली - OnePlus Nord सीरीजच्या फोनमध्ये सातत्याने स्फोट होत असल्याची घटना समोर येत आहे. ऑगस्टमध्ये वनप्लस नॉर्ड 2 फुटल्याची घटना समोर आली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा OnePlus Nord 2 5G च्या फोनचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. गौरव गुलाटी यांनी अवघ्या दहा दिवसांपूर्वी नवा फोन घेतला होता. मात्र अचानक काम करत असताना त्याच्या खिशातून धूर आला आणि फोनचा मोठा स्फोट झाला. यामध्ये थोडक्यात गुलाटी यांचा जीव वाचला आहे. पण ते गंभीररित्या जखमी झाले आहेत.
गौरव गुलाटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते काम करत असताना अचानक त्यांच्या खिशातून धूर येऊ लागला आणि काही समजायच्या आतच वनप्लसच्या फोनचा भीषण स्फोट झाला. पोट, कान आणि डोळ्याला या स्फोटामुळे गंभीर दुखापत झाली आहे. तर फोनमधून आलेल्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच गौरव यांनी वनप्लसच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच स्फोट झाल्यानंतर फोनची नेमकी कशी अवस्था झालीय याचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.
#Blast & #Fire in my brand new #oneplusnord25g.@OnePlus_IN Today morning while i was in my office ( Court Chamber) @OnePlusNord2_@oneplus@OnePlus_USApic.twitter.com/TwNKNmnhzo
— GAURAV GULATI (@Adv_Gulati1) September 8, 2021
"वनप्लसचा फोन म्हणजे डेथ सर्टिफिकेट"
वनप्लसच्या फोनचा स्फोट झाल्यानंतर गौरव यांनी कंपनीशी संपर्क केला. तेव्हा कंपनीच्या वतीने एक व्यक्ती भेटायला आली. त्यांनी इन्वेस्टिगेशनसाठी फोन आपल्या सोबत नेण्याची विनंती केली. पण गौरव यांनी पोलीस केस असल्याने फोन देण्यास नकार दिला. वनप्लसचा फोन म्हणजे डेथ सर्टिफिकेट. हा फोन खिशात ठेवून मी डेथ सर्टिफिकेट घेऊन फिरत होतो असं देखील गौरव यांनी म्हटलं आहे. तसेच थोडक्यात जीव वाचल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
अवघ्या दहा दिवसांपूर्वीच घेतला होता नवा फोन
गौरव यांनी वनप्लस नॉर्ड 2 5G अवघ्या दहा दिवसांपूर्वीच घेतला होता. दोन- तीन दिवसांपासूनच गौरव यांनी नव्या फोनचा वापर करण्यास सुरुवात केली होती. फोनचा स्फोट झाला तेव्हा बॅटरी जवळपास 90 टक्के चार्ज होती. स्फोट झालेल्या फोनचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी देखील काही महिन्यांपूर्वी वनप्लसच्या फोनचा स्फोट झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे.