बापरे! ‘हा’ फोन आहे की बॉम्ब?; थोडक्यात वाचला वकीलाचा जीव; खिशातच झाला मोठा स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 10:38 AM2021-09-11T10:38:40+5:302021-09-11T10:42:18+5:30
गौरव यांच्या फोनमध्ये झालेल्या स्फोटानंतर त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केले.
नवी दिल्ली – OnePlus Nord सीरीज फोनमध्ये वारंवार स्फोट होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीला वनप्लस नॉर्ड २ यात आग लागल्याची बातमी आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा OnePlus Nord 2 5G एका बॉम्बप्रमाणे फुटल्याची घटना घडली आहे. दिल्लीत राहणारे वकील गौरव गुलाटी यांच्या नवीन वनप्लस नॉर्ड २ 5G मध्ये स्फोट झाला आणि त्यात गौरव यांचा जीव थोडक्यात बचावला.
याबाबत गौरव गुलाटी यांनी सांगितले की, जेव्हा मी माझ्या चेंबरमध्ये होतो तेव्हा माझ्या फोनला आग लागली. दिल्लीच्या तीसहजारी कोर्टातील ही घटना आहे. फोनला आग लागल्यानंतर बॉम्बप्रमाणे याचा स्फोट झाला. मी पाहिलं की, माझ्या कोटच्या खिशातून धूर निघत आहे. मला काही कळण्याआधीच कोटमध्ये स्फोट झाला. या स्फोटात गौरव यांच्या पोटाला, कानाला आणि डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. फोनमध्ये लागलेल्या आगीनंतर जो धूर आला त्याने श्वास घेण्यासही त्रास जाणवू लागला. गौरव यांच्या डोळ्यासमोर अंधार झाला. सध्या गौरव यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तसेच या घटनेनंतर गौरव यांनी वनप्लसविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ते कंपनीविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहेत. गौरव यांच्या फोनमध्ये झालेल्या स्फोटानंतर त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर वनप्लसने त्यांच्याशी संवाद साधला. वनप्लसकडून एक व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आला त्याने तपासासाठी फोनसोबत घेऊन जाण्याची मागणी केली. परंतु गौरव यांनी पोलीस प्रकरण असल्याने फोन घेऊन जाण्यास मनाई केली. या घटनेनंतर गौरव यांनी वनप्लसच्या कारभारावर चिंता व्यक्त केली.
#Blast & #Fire in my brand new #oneplusnord25g.@OnePlus_IN Today morning while i was in my office ( Court Chamber) @OnePlusNord2_@oneplus@OnePlus_USApic.twitter.com/TwNKNmnhzo
— GAURAV GULATI (@Adv_Gulati1) September 8, 2021
वनप्लसकडून कुठल्याही प्रकारची मदत त्यांना न झाल्याची खंत गौरव यांनी व्यक्त केली. कंपनीचं म्हणणं आहे की, जोपर्यंत फोन आम्हाला मिळत नाही. त्याचा तपास केला जात नाही तोवर कुठलीही नुकसान भरपाई देणार नाही असं स्पष्ट केले. फोन खरेदी करण्यासाठी गौरव यांनी भलीमोठी रक्कम दिली पण तो फोनच जीवघेणा ठरेल असं गौरव यांना वाटत आहे. दैव बलवत्तर म्हणून गौरव यांचा या स्फोटातून जीव वाचला. वनप्लस नॉर्ड हा फोन दहा दिवसांपूर्वीच गौरव यांनी विकत घेतला होता. २-३ दिवसांपासून वापरात आहे. फोनचा जेव्हा स्फोट झाला तेव्हा मोबाईल बॅटरी ९० टक्के चार्ज होती असं गौरव यांनी सांगितले.