बापरे! यूट्यूब व्हिडीओ आणि गुगल रिव्ह्यूच्या जाळ्यात अडकले 15 हजार लोक; गमावले 700 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 02:34 PM2023-07-26T14:34:27+5:302023-07-26T14:42:59+5:30
एका चीनी ऑपरेटरने 15,000 हून अधिक लोकांना 700 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली.
ऑनलाईन फ्रॉ़ड सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. प्रत्येक व्यवसायातील लोक मग ते इंजिनियर असो की डॉक्टर, त्यांना जाळ्यात अडकवलं जात आहे. पुन्हा एकदा असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चीनी ऑपरेटरने 15,000 हून अधिक लोकांची 700 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली. सोप्या मार्गाने पैसे कमावण्याच्या बहाण्याने हा संपूर्ण फ्रॉड करण्यात आला आहे. सर्वसामान्य आणि कमी शिकलेले लोक याआधी फसवणुकीत अडकले आहेत. ही बाब उघडकीस आल्यानंतर लाखोंची कमाई करणारे सॉफ्टवेअरही जाळ्यात सापडल्याचं समोर आलं आहे.
हैदराबादचे पोलीस आयुक्त सीवी आनंद म्हणतात की, सायबर ठग लोकांना फसवून अतिशय सोप्या पद्धतीने पैसे कमवतात. यामध्ये यूट्यूब व्हिडीओ लाईक करणे आणि गुगल रिव्ह्यू लिहिणं असं काम दिलं जातं. हैदराबाद पोलिसांनी सांगितले की, चीनी ऑपरेटर्सनी आतापर्यंत क्रिप्टो वॉलेटच्या फसवणुकीद्वारे सुमारे 712 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत देशाच्या विविध भागातून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी अनेक क्रिप्टोवॉलेट व्यवहार हिजबुलाह वॉलेटद्वारे केले गेले होते, जे दहशतवादी फंडिंग मॉड्यूलशी जोडलेले होते.
इंजिनिअरने गमावले 82 लाख
लाखो रुपयांचे पॅकेज घेणारे इंजिनिअर देखील त्यांच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी सांगितली आहे. अशाच एका सॉफ्टवेअर व्यावसायिकाने झटपट पैसे कमावण्याच्या लोभापायी अडकून 82 लाख रुपये गमावले. तसेच आतापर्यंत अनेक डॉक्टर, इंजिनिअर आणि इतर व्यावसायिकही या जाळ्यात अडकले आहेत. सहज पैसे कमवण्याची हाव कोणालाही आपल्या जाळ्यात अडकवू शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
हैद्राबादच्या रहिवाशाने पोलिसांना सांगितले की, घोटाळे करणारे रेट आणि रिव्ह्यू करण्याची पार्ट टाईम नोकरी देतात. मेसेजिंग एपद्वारे, ते काही व्हिडीओ पाहण्याचे नाटक करतात आणि त्यांना रेट करतात आणि त्यांचा रिव्ह्यू करतात. या सोप्या कामासाठी 1000 रुपये गुंतवून 5 स्टार रेटिंग देण्यास सांगितले आहे. यानंतर 866 रुपयांचा नफा आहे. नंतर ती वाढवून 25 हजार करण्यात आली आणि 20 हजाराचा नफा दिला. नफ्याचे पैसे काढण्याची परवानगी नाही. तसेच गुंतवणूक व नफा 28 लाखांपर्यंत वाढवून नंतर सर्व रक्कम हडप केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.