बजेट सेगमेंटमध्ये रेडमीला ओपोचा दणका; 5000mAh बॅटरीसह OPPO A16 भारतात सादर
By सिद्धेश जाधव | Published: September 20, 2021 11:38 AM2021-09-20T11:38:40+5:302021-09-20T11:40:53+5:30
Budget phone Oppo A16 Price In India: ओपो ए16 च्या एकमेव व्हेरिएंटची किंमत भारतात 13,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन क्रिस्टल ब्लॅक आणि पर्ल ब्लु रंगात विकत घेता येईल.
OPPO ने आज आपला नवीन बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. हा स्मार्टफोन ‘ए’ सीरीजमध्ये OPPO A16 नावाने लाँच करण्यात आला आहे. MediaTek Helio G35 चिपसेट आणि 5,000mAh ची बॅटरी असे स्पेसीफाकेशन्स असलेला हा स्मार्टफोन फक्त 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनची विक्री अॅमेझॉन इंडिया तसेच ऑफलाईन रिटेल स्टोर्सच्या माध्यमातून केली जाईल.
OPPO A16 ची किंमत
ओपो ए16 च्या एकमेव व्हेरिएंटची किंमत भारतात 13,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन क्रिस्टल ब्लॅक आणि पर्ल ब्लु रंगात विकत घेता येईल. हा नवीन ओपो फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह अॅमेझॉन आणि ऑफलाईन रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल.
OPPO A16s चे स्पेसिफिकेशन्स
ओपो ए16एस स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.52 इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या फोनमध स्टॅंडर्ड रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट आणि पावरव्हीआर जीपीयू देण्यात आला आहे. हा ओप्पो फोन अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11.1 वर चालतो. हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो.
OPPO A16s च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए16एस मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.