पार्सल थेट घरात ! डिलिव्हरी बॉयकडे चावी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 08:10 AM2021-08-18T08:10:40+5:302021-08-18T08:11:02+5:30
अमेझॉननं सर्वांत पहिल्यांदा २०१७ मध्ये दुकानदारांसाठी त्यांनी ही योजना आणली होती. त्यानंतर वॉलमार्टनंही ही योजना आणली होती.
ऑनलाइन शॉपिंगचं प्रमाण तुमच्याकडे किती आहे? दर आठवड्याला, महिन्याला तुमच्याकडे किती डिलिव्हरीज् येतात? आणि असं किती वेळा घडतं की डिलिव्हरी बॉय येऊन गेला; पण आपण घरी नसल्यानं त्याला परत जावं लागलं? आपल्याकडे हा प्रकार कमी असला, तरी पाश्चात्य देशांत असं बऱ्याच वेळा घडतं. शिवाय पार्सल बिल्डिंगच्या आवारात किंवा दरवाजाजवळ ठेवलं तर चोरीस जाण्याची भीती! अमेझॉनचे असे अनेक पार्सल्स चाेरीला गेले आहेत आणि त्याचा बराच मोठा भुर्दंडही त्यांना बसला आहे. आपली कोणतीही डिलिव्हरी परत जाऊ नये आणि ठरलेल्या वेळी ग्राहकाला ती मिळावी यासाठी अमेझॉननं आता एक नवी युक्ती शोधली आहे. पार्सलमालक घरी नसताना त्याच्या घराच्या फ्रंटडोअरची ‘चावी’ डिलिव्हरी बॉयकडे असावी, यासाठी त्यांनी लोकांना विनंती करायला सुरुवात केली आहे. यासाठीचा सारा खर्च अमेझॉन स्वत: करते आहे. आपल्या स्पर्धकांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी ही तरतूद त्यांनी शोधून काढली आहे.
अमेझॉननं सर्वांत पहिल्यांदा २०१७ मध्ये दुकानदारांसाठी त्यांनी ही योजना आणली होती. त्यानंतर वॉलमार्टनंही ही योजना आणली होती.
सुरुवातीला या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, कारण सुरक्षेचा फार मोठा प्रश्न होता. २०१८ला घरगुती ग्राहकांसाठीही त्यांनी ही योजना सुरू केली. हॅकर्स ही तटबंदी फोडू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या आरोपांवर अमेझॉननं अजून उत्तर दिलेलं नाही.
कशी चालते ही प्रणाली?
१ ज्या दिवशी पार्सलची डिलिव्हरी दिली जाईल,
त्याच्या चार तास आधी मालकाला मोबाइलवर नोटिफिकेशन येईल.
२ डिलिव्हरी बॉय किंवा ड्रायव्हर तुमच्या घराजवळ पोहोचल्यावर पुन्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल.
३ ही डिलिव्हरी ‘लाइव्ह’ पाहायचीही सोय आहे.
४ अमेझॉन स्कॅनरद्वारे डिलिव्हरी बॉय दरवाजा वाजवून तो उघडण्याची विनंती करेल.
५ अमेझॉन तंत्रज्ञानाद्वारे खात्री करून घेईल, मग सुरक्षा कॅमेरे सुरू होतील आणि दरवाजाही उघडला जाईल.
६ पार्सल दारातून आत सरकवलं की डिलिव्हरी बॉय ‘दरवाजा बंद करा’ अशी पुन्हा विनंती करील आणि दरवाजा आपोआप बंद होईल.
७ मोबाइलवर लगेच तुम्हाला मेसेज येईल, ‘डिलिव्हरी इज सेन्ट’!..