WhatsApp, Facebook आणि गुगलवर नव्या व्हायरसचं सावट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 02:23 PM2019-07-23T14:23:59+5:302019-07-23T14:34:28+5:30
WhatsApp, Facebook आणि गुगलच्या माहितीवर एका नव्या व्हायरसचं सावट आहे.
नवी दिल्ली - सोशल मीडियावर अनेकजण अॅक्टिव्ह असतात. मात्र हल्ली युजर्सच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. WhatsApp, Facebook आणि गुगलच्या माहितीवर एका नव्या व्हायरसचं सावट आहे. व्हॉट्सअॅपमध्ये Pegasus नावाचा एक व्हायरस आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे फोन ट्रॅक करून त्यामध्ये असलेला डेटा सहजपणे चोरीला जाऊ शकतो.
Financial Times ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, एका इस्त्रायली सॉफ्टवेअर कंपनीने हे स्पायवेअर डिझाईन केलं आहे. NSO ग्रुपने टूल तयार केलं असून Google Drive किंवा iCloud चा डेटा अॅक्सेस करण्याची क्षमता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉनवर स्टोर असलेली सर्व माहिती हा व्हायरस चोरू शकतो. तसेच Apple iCloud देखील हॅक करू शकतो. त्यामुळेच युजर्सचा लोकेशन डेटा, आर्काइव्हड मेसेज आणि फोटो यांना धोका आहे.
Pegasus नावाचा Spyware हा धोकादायक असून ऑथेन्टिकेशन इनवॅलिड झाले तरी युजर्सच्या अकाऊंटला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. हे टूल Android आणि iPhone दोन्हीवर काम करतं. लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोनवरून अपलोड केलेला क्लाऊड डेटा हे टूल अॅक्सेस करतो. हे टूल स्मार्टफोनमधून हटवलं तरी स्मार्टफोनला याचा धोका असतो. आपली कोणती माहिती अॅन्डॉईड अॅपसोबत सामायिक करायची किंवा नाकारायची हा पर्याय वापरकर्त्यांना उपलब्ध असला तरी हजारो अॅन्डॉईड अॅप परवानगी नसतानाही वापरकर्त्यांचा डेटा परस्पर चोरत असल्याचे समोर आले आहे.
इंटरनॅशनल कॉम्प्युटर सायन्स इन्स्टिट्यूट या संस्थेने हा अभ्यास केला. अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशनच्या वैयक्तिक गोपनीयता विभागाकडे मागील महिन्यात संस्थेने आपला अहवाल सादर केला. अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा पर्दाफाश केला आहे. गुगल प्ले स्टोअरवरील 88 हजार अॅन्डॉईड अॅपचा अभ्यास संस्थेने केला. यातील 1325 अॅप खासगी डेटा संपर्क परवानगी नसतानाही आडमार्गाने मिळवीत असल्याचे आढळून आले. हे चोरटे अॅप वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनवरील अशा अॅपशी संधान बांधतात ज्यांना डेटा संपर्काची परवानगी आहे. परवानगी प्राप्त अॅपला जो गोपनीय डेटा उपलब्ध होतो, तो सर्व डेटा प्रतिबंधित अॅपलाही या मार्गाने उपलब्ध होतो. प्रतिबंधित माहिती चोरण्यासाठी अॅपमध्ये असलेल्या कॉमन एसडीके (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कीट) लायब्ररीचा वापर केला जातो.
Google चे कर्मचारी ऐकतात युजर्सचं प्रायवेट व्हॉईस रेकॉर्डिंग
गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र गुगलच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुगल युजर्सच्या सर्व गोष्टी ऐकतो. गुगलचे थर्ड पार्टी कर्मचारी युजर्सचे वैयक्तिक संवाद ऐकतात. तसेच ते संवाद रेकॉर्डही केले जातात अशी माहिती आता समोर आली आहे. गुगल होम स्मार्ट स्पीकर या गुगलचे सेवेचे कर्मचारी युजर्सच्या फोनमध्ये असलेले वैयक्तिक ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकतात. गुगलनेही हे मान्य केलं आहे. मात्र गुगलने यामागेचं कारण सांगितलं आहे. स्मार्ट स्पीकर हे वेगवेगळ्या भाषांमधून ट्रान्स्क्राईब ही सेवा पुरवतं. या सेवेत विविध स्थानिक भाषांमधून बोलणं ऐकून त्यांचे अर्थ लावण्याचं काम केलं जातं आणि त्यानुसार या फीचरमध्ये सुधारणा व्हावी या हेतूने हे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकलं जात असल्याची माहिती गुगलने दिली आहे.