उपराष्ट्रपतींच्या नावाने केली जातेय फसवणूक; 'असं' अडकवताहेत जाळ्यात; वेळीच व्हा सावध अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 12:26 PM2022-04-24T12:26:48+5:302022-04-24T12:27:58+5:30
थेट उपराष्ट्रपतींच्या नावाचा वापर करुन लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - सध्या स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र याचा जसा फायदा आहे. तसा तोटा देखील आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून हल्ली लोकांची फसवणूक केली जात आहे. नवनवीन पद्धतीने लोकांना जाळ्यात अडकवलं जात आहे. ईमेल, ओटीपी आणि एसएमएसद्वारे फ्रॉडच्या घटना वाढत असताना हॅकर्स आता आंतरराष्ट्रीय कॉलच्या नावाने देखील फसवणूक करत आहेत. सरकारकडून सातत्याने अलर्ट केले जात असले तरी अनेकजणांना यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. अशीच एक घटना आता समोर आली आहे.
थेट उपराष्ट्रपतींच्या नावाचा वापर करुन लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वत:ला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) असे सांगून एक व्यक्ती देशातील व्हीआयपींसोबत अनेक जणांना Whatsapp वर मेसेज पाठवत आहे आणि आर्थिक मदतीची मागणी करत आहे. उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाने याबाबत शनिवारी माहिती दिली आणि लोकांना अशा कोणत्याही जाळ्यात फसू नका असं सांगत सतर्क केलं आहे.
उपराष्ट्रपतींच्या सचिवालयाने अधिकृत निवेदनात लोकांना सावध केले आहे की, ही व्यक्ती 9439073183 या मोबाईल नंबरवरून Whatsapp मेसेज पाठवत आहे. तसेच याप्रकारचे बनावट मेसेज आणखी इतरही क्रमांकावरुन येऊ शकतात, अशी शक्यता असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. या व्यक्तीने अनेक व्हीआयपी लोकांना अशाप्रकारे उपराष्ट्रपींच्या नावाने मेसेज पाठवून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. ही बाब उपराष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उपराष्ट्रपती सचिवालयाने गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.