येतोय १०० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन; पाहा डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 06:13 PM2021-02-15T18:13:18+5:302021-02-15T18:15:04+5:30
२०० मेगापिक्सेल मेन कॅमेरा असलेला स्मार्टफोनही लवकरच लाँच होण्याची शक्यता
१०० मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा असलेले स्मार्टफोन्स आपण पाहिले असतील. असं असलं तरी दुसरीकडे सातत्यानं सेल्फी कॅमेराही कंपन्यांकडून अपग्रेड करण्यात येत आहे. सध्या ४४ मेगापिक्सेलपर्यंतचे अनेक स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. परंतु यातही लवकरच मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन्सशी निगडीत लीक देणाऱ्या डिजिटल चॅट स्टेशनच्या माहितीनुसार १०० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोनही लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोणती कंपनी हा स्मार्टफोन तयार करत आहे याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. परंतु चिनी कंपनीकडून हा स्मार्टफोन तयार केला जात असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे कोणती कंपनी हा स्मार्टफोन तयार करतेय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या १०८ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा असेलेल स्मार्टफोन उपलब्ध आहेत. परंतु फोनच्या मागील बाजूला ते अधिक जागा व्यापत असल्याचंही दिसून आलं आहे. अशा परिस्थिती १०० मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा कसा असेल हे पाहावं लागणार आहे.
२०० मेगापिक्सेलचाही फोन येणार ?
१०० मेगापिक्सेलपेक्षा अधिक सेल्फी कॅमेरे असलेल्या स्मार्टफोनला दोन प्रकारे बाजारात आणलं जाऊ शकतं. पहिलं म्हणजे पॉप अप डिझाईन. यात सहजरित्या मोठा कॅमेरा लावता येऊ शकतो. यात दुसरा प्रकार म्हणजे मोटोराईज्ड फ्लिप कॅमेरा. अशा प्रकारच्या कॅमेऱ्याचा वापर Zenfone 6 आणि Zenfone 7 मध्ये पाहायला मिळाला होता. १०० मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्या व्यतिरिक्त आपल्याला लवकरच २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेला स्मार्टफोनही पाहायला मिळणार आहे. ZTE Axon 30 Pro हा स्मार्टफोन जगातील पहिला २०० मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असलेला स्मार्टफोन असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.