मोबाईलची बॅटरी ठरवतेय वापरणाऱ्याचा मूड; 50 टक्के झाल्यास तणावात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:43 AM2019-09-17T11:43:49+5:302019-09-17T13:11:48+5:30
आज सारेजण मोबाईलमध्येच गुंग असल्याचे दिसते. मोबाईलवर काही नोटिफिकेशन आलेले नसले तरीही उगाच मोबाईल उघडून डोकावले जाते. विनाकारण सर्फिंग केले जाते. यामुळे आपले आयुष्य आणि जगणे किती मोबाईलच्या आहारी गेले आहे हे दिसते.
तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य ताब्यात घेतले आहे आणि मोबाईलच्या बॅटरीने माणसाचा मूड. यात कहर म्हणजे आता तर लोकांचे डोकेही मोबाईलच्या बॅटरीनुसार काम करू लागले आहे. लंडन विद्यापीठाच्या मार्केटिंग रिसर्चर थॉमस रॉबिन्सन आणि फिनलंडच्या अल्टो विद्यापीठाच्या अभ्यासादरम्यान ही बाब समोर आली आहे.
आज सारेजण मोबाईलमध्येच गुंग असल्याचे दिसते. मोबाईलवर काही नोटिफिकेशन आलेले नसले तरीही उगाच मोबाईल उघडून डोकावले जाते. विनाकारण सर्फिंग केले जाते. यामुळे आपले आयुष्य आणि जगणे किती मोबाईलच्या आहारी गेले आहे हे दिसते. काही जणांना तर गेम मुळे वेड लागायची वेळ आली आहे. नुकताच कोल्हापुरात एक मुलगा असंबद्ध बडबडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता याच स्मार्टफोनची बॅटरी लोकांचा मूड कसा असेल हे सांगत नाही तर ठरवत आहे.
संशोधकांनी लंडनधील 23 ते 57 वर्षाच्या वयोगटातील 22 अशा लोकांचा अभ्यास केला ज्यांना रोज कुठेतरी जाण्यासाठी 60 ते 180 मिनिटांचा वेळ लागतो. म्हणजेच त्यांना प्रवासात लागणारा वेळ आणि बॅटरीची तुलना कशी करतात याचा अभ्यास करण्यात आला. ज्यांच्या फोनची बॅटरी 50 टक्के शिल्लक आहे त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी आणि बॅटरी फूल चार्ज करण्यासाठी किती वेळ लागतो, याचा विचार केला गेला आहे. अशा लोकांना बॅटरी कमी होत असताना फोन चार्ज करण्याचे सारखे विचार मनात येत असतात. अशावेळी हे लोक जिथे चार्जिंग करता येईल अशा ठिकाणी लवकरात लवकर पोहोचण्याचा किंवा नजीकचे ठिकाण गाठण्याचा प्रयत्न करतात.
ज्या लोकांचा फोन फूल चार्ज असतो ते लोक सकारात्मक मनस्थितीत राहतात आणि विचार करतात की आता ते कुठेही जाऊ शकतात. तर 50 टक्के किंवा त्यापेक्षा कमी बॅटरी शिल्लक असलेल्या लोकांमध्ये नकारात्मकता वाढते. या अभ्यासामध्ये सहभागी लोकांना विचारण्यात आले की, दिवस संपायला आल्यावर मोबाईलच्या बॅटरीचा आयकॉन पाहायला कसा वाटतो. त्यांनी सांगितले, फुल बॅटरी पाहणे सुखावह, 50 टक्के बॅटरी चिंताजनक आणि 30 टक्क्यांवर आल्यास ही चिंता आणखी वाढत जाते.
यंत्रांवर जास्त अवलंबून राहिल्याने हा परिणाम होत असल्याचा निष्कर्ष या अभ्यासकांनी काढला आहे. फोनची बॅटरी अनेक गोष्टींवर परिणाम करते. यामुळे फोन मॅप, डिजीटल वॉलेट, डायरी आणि मनोरंजनावरही परिणाम होतो. रॉबिन्सन्स यांनी सांगितले की, ज्या लोकांची बॅटरी फुल चार्ज असते ते लोक चांगले काम करण्यासाठी योग्य निर्णय किंवा पाऊले उचलतात. तर ज्यांची बॅटरी चार्ज असत नाही ते लोक कोणतेही काम चांगल्या प्रकारे करण्यात मागे राहतात.
ज्या लोकांची फोनची बॅटरी चार्ज नसते ते दुसऱ्यांवर जास्त अवलंबून असतात, त्यांचा समाजातील प्रभावही कमी असतो. त्यांना त्यांच्या आयुष्याचे नियोजन करण्यातही संकटे येत असतात, असे अहवारालात म्हटले आहे.