iPhone 16 घ्यायचाय?... अमेरिकेहून कुणी येणार असेल तर मागवून घ्या?... केवढ्ढे पैसे वाचतील बघा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 05:46 PM2024-09-10T17:46:16+5:302024-09-10T17:47:10+5:30
Apple iPhone 16 series: भारतात काल विक्रीला उपलब्ध झालेल्या आयफोन १६ आणि अमेरिकेतील आयफोनच्या किंमतीतील फरक किती... शोधा कोणी नातेवाईक, नातेवाईकाचा मित्र, मित्राचा नातेवाईक तिकडे आहे का...
अॅप्पलचा आयफोन १६ सिरीज लाँच झाली आहे. किंमती जवळपास आयफोन १५ सारख्याच आहेत. परंतू महाग आहेत. परंतू, एक खुश्कीचा मार्ग आहे तो म्हणजे अमेरिका. भारतापेक्षा अमेरिकेत आयफोन १३ ते ४४ हजारांनी स्वस्त आहेत. काही वर्षांपूर्वी लोक कोणी नातेवाईक, नातेवाईकाचा मित्र, मित्राचा नातेवाईक, ओळखीचा-पाळखीचा अमेरिकेत राहतो का, हे शोधू लागायचे. त्याच्याकडून अनलॉक केलेले आयफोन मागवायचे आणि वापरायचे.
आता ४४ हजार रुपये वाचतायच म्हटल्यावर कोण ही संधी सोडणार. आम्ही तुम्हाला भारतात काल विक्रीला उपलब्ध झालेल्या आयफोन १६ आणि अमेरिकेतील आयफोनच्या किंमतीतील फरक सांगणार आहोत.
भारतात आयफोन 16 हा 79,900 रुपयांना आहे. तर अमेरिकेत तो $799 म्हणजेच 67,096 रुपयांना मिळतो. हा फरक 12,804 रुपयांचा आहे. तुम्ही म्हणाल १२-१३ हजारासाठी कशाला हा उपद्व्याप, मग पुढच्या किंमती पहा. मग तुमच्या लक्षात येईल किती फायदा आहे ते.
iPhone 16 Plus भारतात 89,900 रुपयांना मिळतो. अमेरिकेत याची किंमत $899 एवढी म्हणजेच 75,493 रुपये आहे. हा फरक 14,407 रुपयांचा आहे. iPhone 16 Pro भारतात 1,19,900 रुपयांना मिळतो. त्याची अमेरिकेत 83,891 रुपये किंमत आहे. हा फरक तब्बल 36,009 रुपयांचा आहे. iPhone 16 Pro Max ची भारतातील किंमत 1,44,900 रुपये आहे. हीच अमेरिकेतील किंमत 1,00,686 रुपये म्हणजेच जवळपास ४३-४४ हजारांनी स्वस्त आहे.
हाच आयफोन दुबईत 3,213 ते 13,181 रुपयांनी भारतापेक्षा स्वस्त आहे. चीनमध्ये 9 हजार ते 26,958 रुपयांनी स्वस्त आहे. युकेमध्ये आयफोन 16 भारतापेक्षा 7,876 रुपयांनी तर तर iPhone 16 Plus रुपयांनी 8,862 महाग आहे. याच्या उलट आयफोन मॅक्स आणि प्रो व्हेरिअंट भारतापेक्षा स्वस्त आहेत.