पबजी पुन्हा येणार! भारतासाठी खास गेम असणार; कंपनीकडून मोठी घोषणा
By कुणाल गवाणकर | Published: November 12, 2020 04:36 PM2020-11-12T16:36:51+5:302020-11-12T16:37:09+5:30
लवकरच पबजी नव्या रुपात भारतात परतणार; कंपनीची माहिती
मुंबई: पबजी मोबाईल (PUBG Mobile) भारतात परत येणार आहे. दक्षिण कोरियन कंपनी पबजी कॉर्पोरेशननं याबद्दलची घोषणा केली आहे. भारतीय बाजाराचा विचार करून नवा गेम घेऊन येत असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. भारतात पुन्हा येणाऱ्या पबजीमध्ये चिनी कंपनीची कोणतीही भागिदारी नसेल, हेदेखील कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
भारतात पबजी मोबाईल इंडिया लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती पबजी कॉर्पोरेशननं दिली. नवं ऍप डेटा सुरक्षेच्या नियमांचं अधिक काटेकोरपणे पालन करेल. याशिवाय भारतात मोठी गुंतवणूक करण्यास सज्ज असल्याची माहितीदेखील कंपनीकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात पबजी कॉर्पोरेशननं माध्यमांना अधिकृतपणे महत्त्वाची माहिती दिली आहे. 'प्लेअर्स अननोन बॅटलग्राऊंडची (पबजी) निर्माती असलेली पबजी कॉर्पोरेशन भारतात पबजी मोबाईल इंडिया लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची घोषणा करत आहे,' असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
PUBG Mobile पुन्हा भारतात येणार? एका पोस्टमुळे चर्चेला उधाण
पबजी कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार पबजी मोबाईल इंडियाची निर्मिती खास भारतासाठी करण्यात आली आहे. या माध्यमातून वापरकर्त्यांना अधिक सुरक्षा मिळेल, असा कंपनीचा दावा आहे. वापरकर्त्यांसोबत अधिक उत्तम पद्धतीनं संवाद साधला जावा यासाठी कंपनी भारतात एक सबसिडरी तयार करेल. त्यासाठी भारतातील पबजी कंपनी १०० जणांची टीम तयार करेल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
पबजी कॉर्पोरेशनची मालकी असलेली क्राफ्टॉन भारतात १०० मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. लोकल गेम्स, ई-स्पोर्ट्स, मनोरंजन आणि आयटी उद्योगात कंपनी प्रामुख्यानं गुंतवणूक करेल, असं कंपनीनं सांगितलं आहे. दक्षिण कोरियन कंपनीकडून करण्यात येणारी ही भारतातील सर्वात मोठी गुंतवणूक असेल, असा कंपनीचा दावा आहे.
वापरकर्त्यांच्या सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन मोदी सरकारनं पबजीवर बंदी घातली. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळेच पुन्हा भारतात येताना क्राफ्टॉननं चिनी कंपनी टेन्सेंटची मदत घेतलेली नाही. मात्र इतर देशांमध्ये क्राफ्टॉन टेन्सेंटसोबत काम करत राहणार आहे.