व्हॉटसअॅपवर क्युआर कोड स्कॅन करून होणार पैशांची देवाणघेवाण !
By शेखर पाटील | Published: March 26, 2018 04:04 PM2018-03-26T16:04:18+5:302018-03-26T16:04:18+5:30
व्हॉटसअॅपने आपल्या युजर्ससाठी क्युआर कोड स्कॅन करून पैशांची देवाण-घेवाण करण्याचे फिचर सादर केले आहे.
मुंबई : व्हॉटसअॅपने काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या युपीआय या प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीम भारतात नुकतीच सादर केली आहे. अजून ही सिस्टीम प्रयोगात्मक अवस्थेतच असतांना व्हॉटसअॅपवर आता क्युआर कोड स्कॅन करून देवाण-घेवाण करणारी पेमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. अर्थात ही सुविधा सध्या तरी व्हॉटसअॅपच्या बीटा आवृत्तीमध्ये देण्यात आलेली आहे. गुगल प्ले स्टोअरवरील बीटा प्रोग्रॅमसाठी नोंदणी केलेल्या युजर्सला ही सुविधा पहिल्यांदा वापरण्यासाठी मिळणार आहे. यासाठी संबंधीत युजरला सेटींग-पेमेंट-न्यू पेमेंट-स्कॅन क्युआर कोड या पर्यायाची निवड करावी लागणार आहे. यानंतर व्हाटसअॅपमधील क्युआर कोड स्कॅनर कार्यान्वित होईल. यात ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे त्याचा क्युआर कोड स्कॅन करावा लागेल. तसेच त्या युजरला किती पैसे पाठवायचे आहेत याच्या माहितीसह व्हेरिफिकेशनसाठी युपीआय पीन क्रमांक विचारण्यात येईल. यानंतर पैसे पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. व्हाटसअॅपच्या २.१८.९३ या ताज्या बीटा आवृत्तीच्या युजर्सला हे फिचर वापरण्यासाठी मिळाले आहे. अर्थात हे अजून प्रयोगात्मक अवस्थेत आहे. यात आवश्यक त्या सुधारणा होऊन येत्या कालखंडात याला सर्व युजर्ससाठी सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.
व्हॉटसअॅपने याआधी क्युआर कोड स्कॅनिंगचा उपयोग करून संगणकावर आपल्या मॅसेंजर वापरण्याची सुविधा दिली आहे. यानंतर आता याच प्रणालीचा वापर पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी होणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. भारतात पेटीएमसारख्या पेमेंट सिस्टीम्समध्ये क्युआर कोड स्कॅनींगचा अतिशय अचूक आणि सुरक्षित वापर केला जात आहे. व्हाटसअॅपही याच मार्गावरून जाणार असल्याचेही यातून अधोरेखित झाले आहे.