ओप्पो ए3एस दाखल होण्यासाठी सज्ज
By शेखर पाटील | Published: July 9, 2018 12:49 PM2018-07-09T12:49:52+5:302018-07-09T12:50:05+5:30
ओप्पो कंपनी लवकरच आपला ए३एस हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करणार असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.
ओप्पो कंपनी लवकरच आपला ए३एस हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करणार असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते. ओप्पो ए३एस हे मॉडेल एप्रिल महिन्यात चीनी बाजारपेठेत लाँच करण्यात आले आहे. आता हाच स्मार्टफोन येत्या काही दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठेत दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. कंपनीने याला दुजोरा दिला असल्यामुळे याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते. बहुतांश चिनी कंपन्यांनी अलीकडच्या काळात मिड रेंजवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. मध्यम मूल्यात अतिशय उत्तमोत्तम फीचर्सचा हा पॅटर्न आता ओप्पोदेखील अवलंबत असल्याचे उघड झाले आहे. या अनुषंगाने ओप्पो ए३एस या मॉडेलमध्येही अनेक उत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
ओप्पो ए३एस या मॉडेलमध्ये सुपर फुल स्क्रीन या प्रकारातील डिस्प्ले असणारा आहे. हा डिस्प्ले १९:९ अस्पेक्ट रेशो असणारा, बेझललेस म्हणजेच कडा विरहीत आहे. यामध्ये आयफोन एक्स या मॉडेलप्रमाणे वरील भागात नॉच प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले ६.२ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा (१५२० बाय ७२० पिक्सल्स) आहे. यामध्ये अतिशय गतीमान असा क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर ४५० प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २/३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६/३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस १३ आणि २ मेगापिक्सल्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आलेला आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असणार आहे. या कॅमेर्यात एआय ब्युटी टेक्नॉलॉजी २.० देण्यात आलेली आहे. यातील बॅटरी ४२३० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे असेल.