Realme Narzo 30 सीरिज, Buds Air 2 धमाकेदार एन्ट्रीसाठी तयार, पाहा काय आहेत स्पेसिफिकेशन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 04:23 PM2021-02-18T16:23:29+5:302021-02-18T16:26:25+5:30
Realme 5G Smartphones : २४ फेब्रुवारी रोजी ऑफिशिअल वेबसाईटवरून होणार लाँच
Realme नं आपल्या आगामी Realme Narzo 30 सीरिजच्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. या सीरिजमधील स्मार्टफोन 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता लाँच होणार आहे. कंपनीनं आपली अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर यासंदर्भातील माहिती दिली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनी सुरूवातीला Realme Narzo 30 Pro 5G आणि Realme Narzo 30A हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे.
याच आठवड्यात या दोन्ही स्मार्टफोनची लीक माहिती समोर आली होती. या लीकमध्ये या फोनचं डिझाईन आणि अन्य काही स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली होती. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यापूर्वी XDA Developers ला एक मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी Narzo 30 Pro 5G हा Mediatek Dimensity 800U 5G प्रोसेसरसह येणार असल्याचं म्हटलं होतं.
5000mAh बॅटरी आणि फास्ट चार्जिंग
या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह पंच होल डिस्प्ले देण्यात येणार आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूला व्हर्टिकल डिझाईनच्या मॉड्युलमध्ये कॅमेरा लेन्स देण्यात येईल, याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरीही असू शकते. तसंच हा स्मार्टफोन 65 वॉट फास्ट चार्जिंगही सपोर्ट करेल.
Realme Narzo 30A पॉवरफुल मिडरेंज फोन
Realme Narzo 30A हा पॉवरफुल मिडरेंज स्मार्टफोन असेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये रिअर फिंगरप्रिन्ट सेन्सरसह स्वेअर शेप मॉड्युलमध्ये कॅमेरा सेटअप मिळेल. तसंच याचं रिअर पॅनल ब्लू आणि थोडं टेक्स्चर असलेलं असेल. दरम्यान, दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. परंतु नुकत्याच्या लाँच झालेल्या Realme X7 पेक्षा या स्मार्टफोनची किंमत कमी असेल असं म्हटलं जात आहे.
Buds Air 2 होणार लाँच
या दोन्ही स्मार्टफोन्ससह २४ फेब्रुवारी रोजी Realme Buds Air 2 देखील लाँच केले जातील. हे नवे ट्रू वायरलेस इयरबड्स अॅक्टिव्ह नॉईस कॅन्सलेशन फीचरसह येतील. याव्यतिरिक्त यात ट्रान्सपरन्सी मोडसह अन्य नवे डिझाईनही देण्यात येऊ शकतात.