iPhone-Samsung ला टक्कर देण्यासाठी Realme सज्ज; लाँच करणार अल्ट्रा प्रीमियम फोन
By सिद्धेश जाधव | Published: November 16, 2021 11:52 AM2021-11-16T11:52:58+5:302021-11-16T11:53:13+5:30
Realme Ultra Premium Flagship Phone: आगामी प्रीमियम स्मार्टफोनच्या माध्यमातून Realme आता Samsung, Apple, Huawei आणि Google च्या रांगेत जाऊन बसेल.
शाओमीला बजेट आणि मिडरेंज सेगमेंटमध्ये टक्कर देण्यासाठी ओप्पोने रियलमी हा सब ब्रँड सुरु केला होता. परंतु आता Realme अल्ट्रा प्रीमियम म्हणजे महागड्या फोन्सच्या सेगमेंटमध्ये देखील पाऊल टाकणार असल्याचे दिसत आहे. रियलमीचे संस्थापक आणि सीईओ स्काय ली यांनी कंपनी अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगितले आहे.
सध्या अल्ट्रा प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये अॅप्पलचा दबदबा आहे. त्याचबरोबर वनप्लस, सॅमसंग आणि विवो देखील या सेगमेंटमध्ये सक्रिय आहेत. आता या बड्या कंपन्यांना Realme आपल्या अल्ट्रा-प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनने टक्कर देणार आहे. हा फोन 800 अमेरिकन डॉलर (जवळपास 60,000 रुपये) पेक्षा जास्त किंमतीत सादर करू शकते.
सध्या रियलमीकडे ‘जीटी’ ही फ्लॅगशिप सीरिज आहे, मिडरेंजमधील या सीरिजला वनप्लस, शाओमी, आयक्यू, ओप्पो आणि विवोकडून आव्हान मिळत आहे. तर आगामी प्रीमियम स्मार्टफोनच्या माध्यमातून Realme आता Samsung, Apple, Huawei आणि Google च्या रांगेत जाऊन बसेल. उपरोक्त किंमतीला न्याय देणाऱ्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह कंपनी हा स्मार्टफोन सादर करेल, अशी अपेक्षा आहे.
रियलमीच्या आगामी अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टफोनची अजूनतरी कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु लवकरच या फोन्सचे स्पेक्स आणि फीचर्स समोर येऊ शकतात. कालच कंपनी 125W चार्जिंग स्पीड असलेला फोन सादर करणार असल्याची बातमी आली होती. तसेच काही दिवसांपूर्वी Realme च्या अंडर डिस्प्ले कॅमेरा फोनच्या लाँचची माहिती मिळाली होती. कदाचित हाच तो अल्ट्रा प्रीमियम स्मार्टफोन असू शकतो, परंतु जोपर्यंत ठोस माहिती मिळत नाही तोपर्यंत या माहितीवर विश्वास ठेवता येणार नाही.