मोटो जी 5 एस प्लसच्या मूल्यात पुन्हा कपात
By शेखर पाटील | Published: March 14, 2018 01:48 PM2018-03-14T13:48:22+5:302018-03-14T13:48:22+5:30
मोटोरोला कंपनीने आपल्या मोटो जी५ एस प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात पुन्हा एकदा २ हजार रूपयांची कपात करण्याचे जाहीर केले आहे.
मोटोरोला कंपनीने आपल्या मोटो जी५ एस प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात पुन्हा एकदा २ हजार रूपयांची कपात करण्याचे जाहीर केले आहे. दिवसोदिवस स्मार्टफोनचे मूल्य कमी होत आहे. यामुळे आधीच बाजारपेठेत उपलब्ध असणार्या मॉडेल्सला स्पर्धेत टिकून राहण्यात अडचणी येत असतात. यावर मात करण्यासाठी बहुतांश कंपन्या मूल्य कपातीचा मार्ग पत्करत असल्याचे आधीच अधोरेखित झाले आहे. या अनुषंगाने लेनोव्होची मालकी असणार्या मोटोरोला कंपनीने आपल्या जी५ एस प्लस या मॉडेलच्या मूल्यात कपात जाहीर केली आहे. मोटो जी५एस प्लस हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत १५,९९९ रूपये मूल्यात सादर केले होते. यात मध्यंतरी हजार रूपयांची कपात करण्यात आली आहे. तर आता याचे मूल्य पुन्हा दोन हजारांनी कमी करण्यात आल्यामुळे आता हा स्मार्टफोन ग्राहकांना १२,९९९ रूपयात आहे.
मोटो जी ५ एस प्लस या स्मार्टफोनमधील फुल एचडी डिस्प्ले हा ५.७ इंच आकारमानाचा असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. यात ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ४ जीबी असून स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा आहे. याच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे असून याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण शक्य आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मोटो जी ५ प्लस या मॉडेलमध्ये ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात रॅपीड चार्जींगसह ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे. यात कनेक्टिव्हिटीमध्ये वरील सर्व पर्यायांसोबत एनएफसी हे अतिरिक्त फिचर देण्यात आले आहे.