रिलायन्स जिओचे 'अच्छे दिन' सुरूच; नफ्यात तब्बल 62 टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 09:23 PM2020-01-17T21:23:21+5:302020-01-17T21:24:27+5:30
चालू आर्थिक वर्षामध्ये 2019-20 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये जिओला 1350 कोटींचा शुद्ध नफा झाला आहे.
नवी दिल्ली : साधारण तीन वर्षांपूर्वी धमाकेदार एन्ट्री करून प्रस्थापित कंपन्यांना तोट्यात जाण्यास भाग पाडणाऱ्या रिलायन्स जिओने विक्रम केला आहे. एअरटेल, व्होडाफोन, बीएसएनएलसारख्या कंपन्या तोट्यात असतानाही जिओने मोठा फायदा मिळविला आहे. डिसेंबरच्या तिमाहीमध्ये जिओला तब्बल 62 टक्क्यांचा नफा झाला आहे.
चालू आर्थिक वर्षामध्ये 2019-20 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये जिओला 1350 कोटींचा शुद्ध नफा झाला आहे. हा नफा गेल्या वर्षी पेक्षा 62 टक्क्यांनी अधिक आहे. जिओच्या डेटा ग्राहकांची संख्या वाढत आहे. यामुळे कंपनीचा महसूल 28.3 टक्क्यांनी वाढून 13,968 कोटी रुपये झाला आहे. जिओला गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीमध्ये 831 कोटींचा नफा झाला होता. गेल्या वर्षी महसूल 10884 कोटी रुपये होता.
रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओने घोडदौड सुरूच ठेवली आहे. चांगल्या सेवेमुळे ग्राहकही आनंदात आहेत. जिओने प्रत्यक्षात मोठा बदल घडविला आहे. यामुळे जिओ डिजिटल सेवा प्रदान करणारी कंपनी बनली आहे. 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांच्या संख्येत 32.1 टक्के वाढ झाली. या तिमाहीत एकूण वायरलेस डेटा ट्रॅफिकमध्ये वाढ झाली आहे. 39.9 टक्क्यांनी वाढून 12.8 दशलक्ष जीबी झाला आहे. तर व्हॉईस ट्रॅफिक 30.3 टक्क्यांनी वाढून 82640 दशलक्ष मिनिटे झाला आहे.