Jio नं ऐकली ग्राहकांची मागणी; सादर केला 31 दिवसांचा ‘कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी प्लॅन’, इतकी आहे किंमत
By सिद्धेश जाधव | Published: March 28, 2022 01:50 PM2022-03-28T13:50:11+5:302022-03-28T13:51:12+5:30
Reliance Jio नं ग्राहकांसाठी नवीन प्लॅन सादर केला आहे, ज्याची वैधता 28 दिवस नसून 31 दिवस आहे.
भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर Jio नं पुन्हा एकदा ग्राहकांचा विचार केला आहे. कंपनीनं अन्य कंपन्यांपेक्षा हटके ‘कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी’ प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची किंमत 259 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यात अमर्याद डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स एका कॅलेंडर महिन्यासाठी देण्यात येतील. ज्या तारखेला तुम्ही पहिला रिचार्ज कराल त्याच तारखेला पुढील महिन्यात तुमची रिचार्ज डेट येईल.
उदाहरणार्थ जर तुम्ही आज 28 मार्च 2022 रोजी या प्लॅननं तुमचा मोबाईल नंबर रिचार्ज केला तर एप्रिल 2022 मध्ये देखील तुमची रिचार्ज डेट 28 असेल. याच 28 तारखेला मे, जून, जुलै आणि त्या पुढील देखील रिचार्ज डेट येतील. त्यामुळे कधी तुमच्या रिचार्जची वैधता 31 दिवस असेल, कधी 30 दिवस तर कधी 28 दिवस परंतु तारीख बदलणार नाही.
गेले कित्येक वर्ष टेलिकॉम कंपन्या 28 दिवसांचे रिचार्ज प्लॅन्स सादर करत आहेत. त्यामुळे एका वर्षात 12 महिने असतानाही ग्राहकांना 13 वेळा रिचार्ज करावा लागत आहे. म्हणूनच ग्राहकांची मागणी होती की टेलिकॉम कंपन्यांनी 30 किंवा 31 दिवस वैधता असलेले रिचार्ज प्लॅन्स सादर करावे. आता ही मागणी Jio नं ऐकली आहे.
Reliance Jio Calendar Month Validity Prepaid Plan
Jio च्या अन्य प्रीपेड रिचार्ज प्रमाणे 259 रुपयांचा प्लॅन देखील अनेक वेळा रिचार्ज करून ठेवता येईल. जेव्हा तुमचा सुरु असलेल्या प्लॅनची वैधता संपेल तेव्हा रांगेत असलेला पुढील रिचार्ज सक्रिय होईल. तसेच या प्लॅनमुळे तुमची रिचार्जची तारीख वारंवार बदलणार नाही.
259 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये 1.5GB डेटा रोज मिळेल, त्याचबरोबर अमर्याद कॉल्स आणि रोज 100 SMS मोफत दिले जातील.