Reliance Jio, मीडियाटेकची सर्वात मोठी गेमिंग टुर्नामेंट, लाखो रुपये जिंकण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 11:39 AM2020-12-30T11:39:58+5:302020-12-30T11:44:19+5:30
Reliance Jio : मीडियाटेक या कंपनीसोबत रिलायन्स जिओ या स्पर्धेचं आयोजन करत असून याद्वारे गेमर्सना मोठी रक्कम जिंकण्याचीही संधी मिळणार आहे
Biggest Online Gaming: जर तुम्ही गेम्सचे चाहते आहात तर नक्कीच ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण याच गेम्सच्या माध्यमातून तुम्हाला लाखो रूपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. रिलायन्स जिओ आणि तैवानची कंपनी मीडियाटेकनं ईस्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा ७० दिवस चालणार असून जिओ गेम्सच्या माध्यमातून यात सहभाग घेता येईल. तसंच या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जिओ टिव्ही एचडी स्पोर्ट्स चॅनलवर आणि यूट्यूबवर केलं जाणार आहे. जिओ आणि मीडियाटेकच्या या ईस्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन भारतातील ऑनलाइन गेमिंगच्या चाहत्यांसाठी केलं जात आहे.
मीडियाटेक सोबत जिओ या स्पर्धेचं आयोजन करत असून याद्वारे गेमर्सना मोठी रक्कम जिंकण्याचीही संधी मिळणार आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकाला १२ लाख ५० हजार रूपये जिंकण्याची संधी मिळेल. काही दिवसांपूर्वीच जिओ गेम्सनं ऑनलाइन गेमिंग प्रोग्राम 'इंडियास गेमिंग चॅम्पिअन' या स्पर्धेचं यशस्वीरित्या आयोजन केलं होतं.
कशी असेल ही स्पर्धा?
या स्पर्धेत गेमर्सचं स्किल, टीम वर्क, व्हर्च्युअल गेमिंग एरिनामधील त्यांची क्षमता पाहिली जाणार आहे. या स्पर्धेत गेमिंग मास्टर्सद्वारे तयार करण्यात आलेले रॉयल टायटल, फ्री फायरसारखे गेम्स असतील. जिओ गेम्स प्लॅटफॉर्म्सद्वारे हे जिओ आणि नॉन जिओ ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त गेमर्सना साडेबारा लाखांची रक्कम जिंकण्याचीही संधी मिळणार आहे.
कशी कराल नोंदणी?
२९ डिसेंबरपासून या स्पर्धेच्या नोंदणीला सुरूवात झाली आहे. गेमर्सना ९ जानेवारी २०२१ पर्यंत यासाठी नोंदणी करता येईल. १३ जानेवारी २०२१ ला या स्पर्धेची सुरूवात होईल आणि ७ मार्च रोजी या स्पर्धेचा अखेरचा दिवस असेल. सर्वच जिओ आणि नॉन जिओ ग्राहकांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नोंदणीसाठी गेमर्सना https://play.jiogames.com/esports या लिंकवर क्लिक करावं लागेल. तसंच नोंदणीसाठी किंवा सहभागासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. यासंबंधी अधिक माहितीसाठी https://i.mediatek.com/free-fire-gaming-master-Jioesport या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.