Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 07:34 PM2024-06-18T19:34:00+5:302024-06-18T20:20:09+5:30
Reliance Jio Outage: देशभरातील अनेक जिओ युजर्सना इंटरनेट चालत नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
Reliance Jio : देशभरातील रिलायन्स जिओ युजर्सना गेल्या काही तासांपासून मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. जिओ युजर्सना इंटरनेट वापरण्यात अडचणी येत आहेत. जिओच्या इंटरनेट सेवेबाबत युजर्सनी अनेक तक्रारी केल्या आहेत. युजर्स व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, एक्स, स्नॅपचॅट, यूट्यूब, गुगल आणि इतर दैनंदिन वापरातील अॅप वापरु शकत नसल्याने संतप्त झाले आहेत. कारण गेल्या अनेक तासांपासून जिओची इंटरनेट सेवा रखडली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या आउटेजच्या कारणाबद्दल सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच रिलायन्स जिओने याबद्दल काहीही सांगितले नाही.
देशभरातील युजर्स तक्रार करत आहेत की जिओची इंटरने सेवा काम करत नाहीये. युजर्सचे म्हणणे आहे की त्यांना व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, एक्सप्रेस, स्नॅपचॅट, यूट्यूब आणि गुगल या गोष्टी वापरता येत नाहीये. ५४ टक्क्यांहून अधिक तक्रारदारांना मोबाईल इंटरनेट, ३८ टक्के जिओ फायबर नेटवर्कमध्ये समस्या येत आहेत. आउटेजचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, जिओनेही याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. बऱ्याच युजर्संनी त्यांच्या चिंता व्यक्त केल्या आहेत आणि सेवा कधी सुरु केली जाईल असे विचारले आहे.
सर्वाधिक तक्रारी मोबाईल युजर्संकडून आल्या आहेत. दुपारी १:२५ पासून, युजर्संनी जिओच्या खराब इंटरनेट सेवेबद्दल तक्रारी करण्यास सुरुवात केली, जी अजूनही सुरू आहे. एका महिन्यापूर्वी जिओची सेवा मुंबईतील काही भागात बंद झाली होती. तेव्हाही जिओ युजर्संना ब्रॉडबँड आणि इंटरनेट सेवेचा वापर करताना समस्यांना सामोरे जावे लागले होते.
आउटेजची समस्या जवळपास संपूर्ण देशात दिसून येत आहे. पण Downdetector च्या मते, हे चंदीगड, दिल्ली, लखनौ, रांची, कोलकाता, कटक, नागपूर, सुरत, मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी या ठिकाणी जास्त दिसत आहे.
कशामुळे ठप्प झाली सेवा?
अद्यापपर्यंत जिओकडून याबाबत स्पष्टीकरण आलेले नाही. तज्ञांच्या मते, हे सर्व्हरमधील समस्येमुळे होऊ शकते. सध्यातरी कोणत्याही अधिकाऱ्याने याला दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, सोशल मीडिया युजर्सनी मीम्स शेअर करून रिलायन्स जिओला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. Jio down, WhatsApp down, Instagram down, Telegram down, Snapchat down हे हॅशटॅग सर्वाधिक वापरले जात आहेत.