रिलायन्स जिओने १८९ रुपयांचा प्लॅन गुपचूप हटविला; सिम अॅक्टिव्हेट कसे ठेवणार? हाच तर स्वस्त होता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:25 IST2025-01-30T20:25:17+5:302025-01-30T20:25:37+5:30
रिलायन्स जिओचा व्हॅलिडीटी वाढविण्याचा म्हणा किंवा सिम कार्ड चालू ठेवण्याचा म्हणा १८९ रुपयांचा कमी किंमतीचा प्लॅन होता.

रिलायन्स जिओने १८९ रुपयांचा प्लॅन गुपचूप हटविला; सिम अॅक्टिव्हेट कसे ठेवणार? हाच तर स्वस्त होता...
रिलायन्स जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये क्रांती केलेली आहे. फोरजी नंतर ५जी आणत थेट देशातील सर्वात मोठी खासगी कंपनी बनण्याचा मान मिळविला आहे. अशातच रिलायन्स जिओ टेलिकॉम मार्केटलाही दिशा देण्याचे काम करत आहे. काही वर्षांपूर्वी ४जी फ्री करून इतर कंपन्यांच्या रिचार्जच्या किंमती धडाधड उतरविल्या होत्या. आता जिओने वाढविल्यावर या कंपन्या वाढवत आहेत. अशातच आता जिओने त्यांचा सर्वात स्वस्त समजला जाणारा आणि सिम जिवंत ठेवणारा प्लॅनच गुपचूप हटविल्याने खळबळ उडाली आहे.
रिलायन्स जिओचा व्हॅलिडीटी वाढविण्याचा म्हणा किंवा सिम कार्ड चालू ठेवण्याचा म्हणा १८९ रुपयांचा कमी किंमतीचा प्लॅन होता. काही महिन्यांपूर्वी दर वाढविण्यापूर्वी हाच प्लॅन १५५ रुपयांना मिळत होता. तो जिओने हटविला आहे. यामुळे ग्राहक आता हा प्लॅन रिचार्ज करू शकणार नाहीत. तसेच ४७९ रुपयांचा प्लॅनही जिओने हटविला आहे.
ट्रायच्या आदेशावरून कंपनीने फक्त कॉलिंग किंवा एसएमएस असलले प्लॅन आणले आहेत. अनेकजण एअरटेल, व्होडाफोन किंवा जिओचे इंटरनेट वापरत नव्हते. परंतू, या लोकांना सरसकट रिचार्ज मारावे लागत होते. यामुळे ट्रायने या लोकांसाठी वेगळे पर्याय असलेले प्लॅन आणण्याचे आदेश दिले होते.
कंपन्यांनी हुशारी केलेली पण...
ज्या किमतीत डेटा असलेले प्लॅन उपलब्ध होते त्याच किमतीत कंपन्यांनी फक्त कॉलिंग आणि एसएमएस असलेले प्लॅन लाँच केले आहेत. यानंतर ट्रायने सर्वच प्लॅनची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर कंपन्यांनी ते प्लॅन बंद करून नवीन कमी किंमतीचे प्लॅन बाजारात आणले आहेत. पूर्वी एअरटेलच्या या प्लॅनची किंमत ४९९ आणि १९५९ रुपये होती, पण आता किमतीत कपात केल्यानंतर या प्लॅनच्या नवीन किमती ४६९ आणि १८४९ रुपये करण्यात आल्या आहेत. हा फरक फार नसला तरी काही पैसे वाचविणारा आहे.