मंदीचा विळखा वाढला; ऑटो, स्टीलनंतर टीव्हींची विक्री थंडावली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 04:56 PM2019-08-06T16:56:20+5:302019-08-06T16:56:58+5:30
देशभरामध्ये टीव्ही स्क्रीन बनवून विकणारी कंपनी बीपीएल, सोनी, सॅमसंग, पॅनॉसोनिक यांनी उत्पादनामध्ये 20 टक्के कपात केली आहे.
नवी दिल्ली : विक्री मंदावल्यामुळे टाटा, मारुतीसारख्या बड्या कंपन्यांना फटका बसला असताना आता टीव्ही कंपन्यांनाही जोरदार धक्का बसला आहे. यामुळे या कंपन्यांनी उत्पादन करण्यामध्ये कपात केली आहे. याचा परिणाम नोकऱ्यांवरही होण्याची शक्यता आहे.
देशभरामध्ये टीव्ही स्क्रीन बनवून विकणारी कंपनी बीपीएल, सोनी, सॅमसंग, पॅनॉसोनिक यांनी उत्पादनामध्ये 20 टक्के कपात केली आहे. उन्हाळा आणि क्रिकेट विश्वचषकामुळे टीव्हींची विक्री वाढण्याची आशा कंपन्यांना होती. मात्र, यामध्ये कंपन्या अपयशी ठरल्या आहेत. याचा परिणाम असा झाला की, विक्रेत्यांकडे गेल्या काही महिन्यांपासून टीव्ही पडून आहेत.
डीलरनी कंपन्यांकडून विक्री होण्याच्या आशेमुळे मे महिन्यात मोठ्या प्रमाणात माल मागविला होता. मात्र, विक्रीमध्ये वाढ झाली नाही. यामुळे डीलरकडेही मोठ्या प्रमाणावर माल पडून आहे. देशभरात काही महिन्यांमध्ये उत्सव येणार आहेत. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, फ्रिज, वॉशिंग मशिन यासारख्या वस्तूंच्या विक्रीमध्ये मोठी वाढ होण्याची आशा कंपन्यांना आहे. मान्सूनच्या काळात वॉशिंग मशीनची विक्री जास्त होते. मात्र, मंदी आणि दुष्काळाचा फटका या विक्रीला बसला आहे. जर ऑगस्ट महिन्यात विक्री वाढली नाही तर कंपन्यांना उत्पादन थांबवावे किंवा कमी करावे लागेल.
कंपन्या येत्या काही दिवसांत उत्पादनात 10 ते 15 टक्के कपात करू शकतात. जर विक्रीत वाढ नाही झाली तर कंपन्यांना कर्मचारी कपात करावी लागणार आहे. तसेच डीलरही विक्री न वाढल्यास खर्च कमी करण्यासाठी कामगार कपात करण्याच दाट शक्यता आहे.