‘रोपोसो’ बनेल भारताचा टिकटॉक; चिनी अॅपवरील बंदीनंतर वेगाने लोकप्रिय झाले देशी अॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 04:32 AM2020-07-04T04:32:32+5:302020-07-04T06:55:55+5:30
टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाइट डान्सने २०१९ मध्ये जगात १.३३ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला व त्यातील ४३.७ कोटी रुपये भारतीय बाजारातील होते
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : भारत सरकारने ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतरही अनेक चिनी अॅप वापरले जात असले तरी भारतीय मोबाइल अॅप्लिकेशन्सची लोकप्रियताही वेगाने वाढत आहे. छोट्या व्हिडिओसाठीचा भारतीय प्लॅटफॉर्म रोपोसोने या बाजारात खळबळ निर्माण केली आहे. तो टिकटॉकची जागा घेताना दिसतो आहे. याशिवाय चिंगारी, मित्रों हे अॅपदेखील नवी उंची गाठताना दिसतात. जाणकारांचे म्हणणे असे की, या अॅप्सचे वर्तुळ विस्तारत असले तरी यश दूर आहे. टिकटॉक हटल्यानंतर भारतीय अॅप रोपोसोला गुगल प्लेस्टोअरवरून डाऊनलोड केलेल्यांची संख्या ५० दशलक्षांच्याही पुढे गेली आहे. १० भारतीय भाषांचा पर्याय देणारे हे अॅप्लिकेशन ८०० दशलक्षांपेक्षा जास्त युझर्स असलेल्या टिकटॉकपेक्षा खूप दूर आहे; परंतु ज्या वेगाने त्याची वाढ होत आहे त्यावरून तो टिकटॉकला पर्याय होत आहे.
टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाइट डान्सने २०१९ मध्ये जगात १.३३ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला व त्यातील ४३.७ कोटी रुपये भारतीय बाजारातील होते. असे म्हटले जाते की, टिकटॉक भारताबाहेर जी कमाई करतो त्यात भारतीय युजर्सचा वाटा जास्त असतो. बंदीमुळे इतर देशांतीलही कमाई कमी होईल.
भारतीय रेटिंग डाऊनलोड अॅप्स
रोपोसो ४.२ ५० दशलक्ष प्लस
चिंगारी ४.१ १० दशलक्ष प्लस
मित्रों ४.३ १० दशलक्ष प्लस
लाइटएक्स ४.५ १० दशलक्ष प्लस
जिओस्वीच ४.७ १० दशलक्ष प्लस
प्रतिलिपी ४.६ १० दशलक्ष प्लस
एन्जॉय ४.५ ०५ दशलक्ष प्लस