ओप्पो एफ ३ स्मार्टफोनची रोझ गोल्ड आवृत्ती
By शेखर पाटील | Published: August 8, 2017 01:55 PM2017-08-08T13:55:37+5:302017-08-08T13:55:51+5:30
ओप्पो कंपनीने आपल्या ड्युअल फ्रंट कॅमेर्यांनी सज्ज असणार्या ओप्पो एफ ३ या स्मार्टफोनचे रोझ गोल्ड रंगाचे व्हेरियंट सादर केले असून याचे मूल्य १९,९९० रूपये इतके असेल.
ओप्पो कंपनीने आपल्या ड्युअल फ्रंट कॅमेर्यांनी सज्ज असणार्या ओप्पो एफ ३ या स्मार्टफोनचे रोझ गोल्ड रंगाचे व्हेरियंट सादर केले असून याचे मूल्य १९,९९० रूपये इतके असेल. ओप्पो कंपनीने भारतात मे महिन्यात ओप्पो एफ ३ हा स्मार्टफोन सादर केला होता. हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आला असून याला बर्यापैकी प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्वभूमिवर आता या मॉडेलचे रोझ गोल्ड रंगातील व्हेरियंट भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. वर नमूद केल्यानुसार ओप्पो एफ ३ हा सेल्फी स्पेशल स्मार्टफोन आहे. या मॉडेलमध्ये १६ आणि ८ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील दुसरा कॅमेरा हा १२० अंशाच्या लेन्सने सज्ज आहे. याच्या मदतीने उत्तम दर्जाचा ग्रुप सेल्फी घेता येईल. तसेच दोन्ही कॅमेर्यांच्या एकत्रीत इफेक्टमुळे दर्जेदार सेल्फी काढता येतील असा दावा कंपनीने केला आहे. यात स्मार्ट फेशियल हे फिचर इनबिल्ट स्वरूपात देण्यात आले आहे. ओप्पो एफ ३ या स्मार्टफोनमधील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून याच्या मदतीने फुल एचडी क्षमतेचे चित्रीकरण करणे शक्य आहे.
उर्वरित फिचर्सचा विचार करता ओप्पो एफ ३ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा अर्थात फुल एचडी क्षमतेचा २.५ डी डिस्प्ले प्रदान करण्यात आला असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण असेल. १.५ गेगाहर्टझ ऑक्टा-कोअर मीडियाटेक एमटी६७५०टी या प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या मार्शमॅलो आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा कलर ३.० हा युजर इंटरफेस असेल. तर यात ३२०० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.