रशियाने टेक कंपनी Google ला ठोठावला मोठा दंड, जाणून घ्या कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:46 IST2025-02-18T13:46:29+5:302025-02-18T13:46:56+5:30
रशियाच्या एका न्यायालयाने गुगलला ३.८ मिलियन रुबल (जवळपास ३६ लाख रुपये) दंड ठोठावला आहे.

रशियाने टेक कंपनी Google ला ठोठावला मोठा दंड, जाणून घ्या कारण काय?
रशियाने अमेरिकन टेक कंपनी गुगलला (Google) मोठा दंड ठोठावला आहे. यूट्यूबवरील (YouTube) व्हिडिओंमुळे गुगलला हा दणका बसला आहे. यूट्यूब हे गुगलच्या मालकीचे आहे. यूट्यूबवर असणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये रशियन सैनिकांना सरेंडर करण्याच्या पद्धती दाखविल्या जात होत्या. त्यामुळे रशियाच्या एका न्यायालयाने हे बेकायदेशीर असल्याचे सांगत गुगलला दंड ठोठावला आहे.
रशियाच्या एका न्यायालयाने गुगलला ३.८ मिलियन रुबल (जवळपास ३६ लाख रुपये) दंड ठोठावला आहे. दरम्यान, रशिया गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचा कंटेंट टेक कंपन्यांकडून हटविण्याचे काम करत आहे, जो त्यांना बेकायदेशीर वाटत आहे. जर एखाद्या कंपनीने हे केले नाही तर तिला दंड आकारला जात आहे. जरी दंडाची रक्कम कमी असली तरी, कंपन्यांना अनेक वेळा दंड आकारण्यात आला आहे. याबद्दल गुगलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
रशियामध्ये यूट्यूब डाउनलोड स्पीड कमी केला जातोय. सरकारवर टीका करणारा कंटेट लोकांना पाहता येऊ नये म्हणून हे केले जात आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र, रशियाने याचा इन्कार केला आणि म्हटले की, हे गुगलमुळे होत आहे. गुगल आपले डिव्हाइस अपग्रेड करत नाही आहे, ज्यामुळे लोक यूट्यूबवर कंटेंट पाहू शकत नाहीत.
दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुगलचा अमेरिकन सरकारचे एक टूल म्हणून उल्लेख केला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांनी म्हटले होते की, गुगल हे अमेरिकन सरकारचे एक टूल आहे आणि त्याचा वापर राजकारणासाठी केला जात आहे.
याआधी सर्वात मोठा दंड ठोठावला होता
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रशियाने गुगलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड ठोठावला होता. खरंतर, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर, यूट्यूबने आपल्या प्लॅटफॉर्मवर रशियाच्या सरकारी मीडियावर बंदी घातली होती. त्यामुळे रशियाने गुगलवर मोठा दंड ठोठावला होता. ही रक्कम संपूर्ण जगाच्या GDP पेक्षा जास्त होती.