बॉस माऊस कुठेय? ओव्हरटाईम टळणार, सॅमसंग आणतेय गायब होणारा माऊस...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 07:29 PM2022-09-07T19:29:33+5:302022-09-07T19:40:48+5:30
तुमचे कामाचे आणि घरचे आयुष्य सिरिअस करायचे नसेल तर बॉसलाही असाच माऊस भेट द्यायला हवा, नाही का? आहे की नाही भन्नाट कल्पना...
काम काम आणि काम... वेळ संपली तरी काम काही संपत नाही. सध्या वर्क फ्रॉम होम सुरु आहे. मोठमोठ्या टेक कंपन्यांपासून ते साध्या साध्या कंपन्यांना कोरोनाने घरातून काम करण्याचे फायदे शिकविले आहेत. कर्मचाऱ्यांकडून जादा वेळ काम करून घेता येते, वीज वाचते, कर्मचाऱ्यासाठीचा ऑफिसमधील खर्च वाचतो हे काही फायदे. अनेकदा बॉस तुम्हाला २४ बाय ७ गृहीतच धरतो. कधीही फोन करणे, हे काम करून दे सांगणे हे सर्वांनाच नित्याचे झाले आहे. पण एक कंपनी अशी आहे जी तुमचा विचार करतेय.
सॅमसंग अशा माऊसवर काम करत आहे, जो तुमच्या कामाचा आणि तुमच्या कौटुंबीक आयुष्याचा बॅलन्स ठेवेल. यामुळे कंपनी Samsung Balance Mouse वर काम करत आहे. हा माऊस तुम्हाला ओव्हरटाईम करण्यापासून वाचविणार आहे.
कंपनी एका कॉन्सेप्ट माऊसवर काम करत आहे. जर तुम्ही ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम केलात तर तो माऊस बदलणारआहे. हा जगावेगळा माऊस जाहिरात एजन्सी INNORED च्या सहकार्याने विकसित केला जात आहे. यासाठी सॅमसंगने डिझाईन स्टुडिओ BKID सोबत पार्टनरशिप केली आहे. हा दिसताना साध्या माऊससारखाच दिसणार आहे. मात्र, त्याचा वापर तुम्हाला ओव्हरटाईमपासून वाचविणार आहे. जेव्हा तुमची कामाची वेळ संपेल तेव्हा त्याचे कान बाहेर येणार आहेत. यामुळे तुम्ही क्लिक करू शकणार नाही.
यामागची संकल्पना खूप साधी आहे. तुमचे कामाचे आणि घरचे आयुष्य सिरिअस करायचे नसेल तर बॉसलाही असाच माऊस भेट द्यायला हवा, नाही का? जास्त काम करणाऱ्या लोकांनाही हा माऊस डेस्कवरून उठण्यासाठी रिमाईंडर देत राहणार आहे. आहे की नाही भन्नाट कल्पना...