Samsung ला मोठा धक्का! Galaxy स्मार्टफोनच्या सोर्स कोडसह 190GB डेटा लीक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 12:25 PM2022-03-08T12:25:20+5:302022-03-08T12:25:58+5:30
रिपोर्टनुसा, LAPSUS$ या हॅकर ग्रुपने सॅमसंगचा 190GB डेटा त्यांच्या टेलीग्राम चॅनेलवर अपलोड केला.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला (Samsung Electronics Co.) मोठा धक्का बसला आहे. सॅमसंगचा अंतर्गत डेटा लीक झाल्याची माहिती मिळत आहे. कंपनीने सांगितले की, लीक झालेल्या डेटामध्ये गॅलेक्सी स्मार्टफोनच्या ऑपरेशनचा सोर्स कोड सामील आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार (Bloomberg Report), एका हॅकरच्या ग्रुपने सॅमसंग डेटामध्ये प्रवेश केल्याचा दावा केला आहे. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, या हॅकर ग्रुपने काही वेळापूर्वी एनव्हीडियावरही हल्ला केला होता.
ग्राहकांवर कोणताही परिणाम नाही
कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, यापुढे अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी तयारी करण्यात आली आहे. ग्राहकांच्या वैयक्तिक डेटावर याचा कोणताही परिणाम झाला नसल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली. सॅमसंगच्या म्हणण्यानुसार, या सुरक्षा उल्लंघनामध्ये गॅलेक्सी डिव्हाइसच्या ऑपरेशनशी संबंधित काही सोर्स कोड लीक झाला. पण, त्यात कोणत्याही ग्राहक किंवा कर्मचार्यांचा वैयक्तिक डेटा नव्हता. याचा परिणाम आमच्या व्यवसायावर किंवा ग्राहकांवर होणार नाही.
लीक झालेल्या फाईलचा आकार 190GB आहे
भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आम्ही आवश्यक ती पावले उचलली आहेत आणि आम्ही ग्राहकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय निरंतर सेवा देत राहू, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, LAPSUS$ हॅकर ग्रुपने सॅमसंगचा 190GB टॉरेंट फाइल डेटा त्यांच्या टेलीग्राम चॅनेलवर अपलोड केला आहे.
लीक डेटामध्ये सोर्स कोड
हॅकर ग्रुपने असा दावा केला आहे की, फाइलमध्ये सॅमसंगचा गोपनीय सोर्स कोड आहे. यामुळे कंपनीच्या डिव्हाइस सुरक्षा प्रणालीचा पर्दाफाश झाला. या यादीतील आयटममध्ये Samsung स्मार्टफोन बायोमैट्रिक ऑथेंटिकेशन आणि बूटलोडर सोर्सचे अल्गोरिदम आहेत, ज्याचा वापर काही ऑपरेटिंग सिस्टम कंट्रोलला बायपास करण्यासाठी केला जाऊ शकतो.