दोन व्हेरियंटमध्ये मिळणार सॅमसंग गॅलेक्सी ऑन ७ प्राईम
By शेखर पाटील | Published: January 22, 2018 12:25 PM2018-01-22T12:25:06+5:302018-01-22T12:26:02+5:30
सॅमसंग कंपनीने आपला गॅलेक्सी ऑन ७ प्राईम हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये बाजारपेठेत उतारला असून ग्राहकांना हे मॉडेल अमेझॉन इंडिया या शॉपिंग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ऑन ७ प्राईम हा स्मार्टफोन ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज तसेच ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे १२,९९० आणि १४,९९० रूपये मूल्यात बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आला आहे. या दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट प्रदान करण्यात आला असून याच्या मदतीने स्टोअरेज वाढविता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी ऑन ७ प्राईम या मॉडेलला मेटलची बॉडी प्रदान करण्यात आली असून याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर असेल.
यातील डिस्प्ले हा ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी (१०८० बाय १९२० पिक्सल्स) क्षमतेचा असेल. यात ऑक्टा-कोअर एक्झीनॉस ७८७० प्रोसेसर असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे. सॅमसंग गॅलेक्सी ऑन ७ प्राईम या स्मार्टफोनमध्ये एफ/१.९ अपार्चरसह १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. वाढीव अपार्चरमुळे हा कॅमेरा कमी उजेडातही उत्तम दर्जाच्या प्रतिमा घेण्यास सक्षम असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर सॅमसंग कंपनीने विकसित केलेल्या अल्ट्रा पॉवर सेव्हींग मोडसह यात ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.
यात सॅमसंग पे मिनी या प्रणालीचा इनबिल्ट सपोर्ट असल्याने युपीआयवर आधारित प्रणालीच्या मदतीने इन्स्टंट देवाण-घेवाण करता येईल. याशिवाय या सॅमसंग मॉल हे अभिनव फिचर देण्यात आले आहे. यात कुणीही युजर एखाद्या प्रॉडक्टचे कॅमेर्याच्या मदतीने छायाचित्र काढल्यानंतर संबंधीत प्रॉडक्टला विविध ई-कॉमर्स साईटवरून खरेदी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. सध्या अमेझॉन, शॉपक्लुज, जबोंग आणि टाटाक्लिक या साईटवरून या माध्यमातून उत्पादने खरेदी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तर यात लवकरच अन्य शॉपिंग पोर्टलचा समावेश करण्यात येणार असल्याचं सॅमसंग कंपनीने स्पष्ट केलं आहे.