सॅमसंग गॅलेक्सी जे ८ (२०१८) मॉडेलचे अनावरण
By शेखर पाटील | Published: May 22, 2018 01:06 PM2018-05-22T13:06:05+5:302018-05-22T13:06:05+5:30
सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे ८ या स्मार्टफोनची नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले आहे.
सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे ८ या स्मार्टफोनची नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले आहे. शाओमीच्या झंझावाताला तोंड देण्यासाठी सॅमसंगने भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने या कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे ८ (२०१८) या मॉडेलचे अनावरण केले आहे. सॅमसंगच्या अलीकडील बहुतांश मॉडेल्समध्ये इन्फीनिटी डिस्प्ले दिलेला असतो. या पार्श्वभूमिवर, गॅलेक्सी जे ८ मध्येही याच प्रकारचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. तसेच यात ड्युअल कॅमेरा सेटअपदेखील असेल. याच्या मागील बाजूस एफ/१.७ अपर्चरयुक्त १६ मेगापिक्सल्स तसेच एफ/१.९ अपर्चरयुक्त ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. या दोन्हींच्या मदतीने दर्जेदार प्रतिमा घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एलईडी फ्लॅशयुक्त १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी जे ८ या मॉडेलमध्ये ६ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १४८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा फुल स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये कोर्टेक्स ए५३ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असून मायक्रो-एसडीच्या मदतीने याला वाढविण्यात येणार आहे. तर यामध्ये ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरिओ या आवृत्तीवर चालणारे असेल.
सॅमसंग गॅलेक्सी जे ८ या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. बाजारपेठेत हे मॉडेल १८,९९० रूपये मूल्यात मिळणार आहे.