सॅमसंग गॅलेक्सी एस ८ अॅक्टीव्ह : काय आहेत फिचर्स ?
By शेखर पाटील | Published: August 9, 2017 03:46 PM2017-08-09T15:46:33+5:302017-08-11T13:27:08+5:30
सॅमसंग कंपनीने आपले सॅमसंग गॅलेक्सी एस ८ अॅक्टीव्ह हे फ्लॅगशीप मॉडेल बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून ते रफ वापरासाठी उपयुक्त असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
येत्या काही दिवसांमध्ये सॅमसंग कंपनी आपले बहुप्रतिक्षित गॅलेक्सी नोट ८ हे उच्च श्रेणीतील मॉडेल ग्राहकांना सादर करणार असून याबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागली आहे. या आधीच सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी एस ८ अॅक्टीव्ह हे मॉडेल बाजारपेठेत सादर केले आहे. पहिल्यांदा अमेरिकन ग्राहकांना ते उपलब्ध करण्यात आले असून लवकरच भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये ते सादर करण्यात येईल असे मानले जात आहे. सॅमसंगच्या अॅक्टीव्ह या मालिकेतील स्मार्टफोन हे खास करून रफ वापरासाठी आवश्यक असणार्या विविध फिचर्सनी सज्ज आहेत. अर्थात सॅमसंग गॅलेक्सी एस ८ अॅक्टीव्ह हे मॉडेलदेखील याला अपवाद नाही. यात अतिशय मजबूत अशी मेटल फ्रेम प्रदान करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ, डस्टप्रूफ व शॉकप्रूफ आहे. याचा डिस्प्ले ‘शॅटरप्रूफ’ असून समार्टफोन अगदी पाच फुट उंचीवरून पडूनही याच्या स्क्रीनला साधा तडादेखील जात नसल्याचा सॅमसंग कंपनीचा दावा आहे. या मॉडेलला लष्करी उपकरणांप्रमाणे मजबूती प्रदान करण्यात आली असून याच्या जोडीला उत्तम दर्जाचे वेष्टणदेखील असेल. अगदी विषम वातावरणातही याला सुलभपणे वापरता येत असल्याचे सॅमसंग कंपनीतर्फे नमूद करण्यात आले आहे.
उर्वरित फिचर्सचा विचार केला तर, या स्मार्टफोनमध्ये बॅटरीचा अपवाद वगळता सॅमसंग गॅलेक्सी एस ८ या मॉडेलमधील बहुतांश फिचर्स असतील. यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून याच्या मदतीने ३२ तासांचा टॉकटाईम तर पाच दिवसांचा स्टँडबाय टाईम मिळत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामध्ये इन्फीनिटी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात कडांचा वापर न करता मोठ्या डिस्प्लेचा वापर करता येणार आहे. या मॉडेलमध्ये ५.८ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी म्हणजेच २५६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले असेल. याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविता येईल.
सॅमसंग गॅलेक्सी एस ८ अॅक्टीव्ह या मॉडेलमध्ये मुख्य व फ्रंट कॅमेरे अनुक्रमे १२ व ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. यातल्या फ्रंट कॅमेर्यामध्ये स्मार्ट ऑटो-फोकस हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाचे सेल्फी घेता येईल असा कंपनीने दावा केला आहे. तर याच्या मुख्य कॅमेर्यात ऑटो-फोकस, ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन, एलईडी फ्लॅश आणि ८ एक्स एवढ्या डिजीटल झूमची व्यवस्था असेल.