सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लसच्या मूल्यात पाच हजारांची घट
By शेखर पाटील | Published: August 28, 2017 09:49 AM2017-08-28T09:49:13+5:302017-08-28T10:00:33+5:30
सॅमसंग कंपनीने आपल्या सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस या मॉडेलच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटमध्ये तब्बल पाच हजारांनी घट केल्याचे जाहीर केले आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस हे दोन्ही मॉडेल भारतीय बाजारपेठेत या वर्षाच्या मे महिन्यात लाँच करण्यात आले होेते. यातील सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस हे मॉडेल ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले होते. यातील ६ जीबी रॅमच्या व्हेरियंटचे मूळ मूल्य ७४,९०० रूपये इतके होते. मात्र एका महिन्यातच सॅमसंग कंपनीने यात चार हजार रूपयांची सूट दिल्यामुळे हे मॉडेल ७०,९०० रूपयात मिळू लागले होते. तर आता या मॉडेलमध्ये पुन्हा एकदा पाच हजारांची सूट देण्यात आली असून अर्थातच हा स्मार्टफोन आता ६५,९०० रूपयात मिळणार आहे. आता गमतीची बाब अशी की याच स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅमचे व्हेरियंट फक्त एक हजारांनी कमी म्हणजे ६४,९०० रूपयात मिळत आहे. यामुळे फक्त एक हजार रूपये जास्त खर्च करून कुणीही हायर व्हेरियंट घेऊ शकतो. यामुळे ४ जीबी रॅमच्या व्हेरियंटचे मूल्यदेखील कमी होण्याची शक्यता आहे. सॅमसंग कंपनी येत्या काही दिवसात अलीकडेच लाँच करण्यात आलेले सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे. या पार्श्वभूमिवर सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस या मॉडेलमध्ये सूट देण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस या मॉडेलमध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत. यामध्ये सॅमसंग कंपनीने विकसित केलेला बिक्सबी हा व्हर्च्युअल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ६.२ इंच आकारमानाच्या आणि क्युएचडी म्हणजेच २९६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज आहे. यात ऑक्टा-कोअर सॅमसंग एक्झीनॉस ८८९५ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि एफ/१..७ अपार्चरसह यात १२ ड्युअल पिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ऑटो-फोकस आणि एफ/१.७ अपार्चरसह ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस या मॉडेलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, आयरिस रेकग्नीशन आणि फेस रिकग्नीशन या सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. याच्या मदतीने कुणीही या मॉडेलला लॉक/अनलॉक करू शकतो. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहेत. वायरलेस चार्जिंगसह या स्मार्टफोनमध्ये ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्ट रेझिस्टंट आहे.