सॅमसंग गॅलेक्सी एस ९ आणि एस ९ प्लसची घोषणा
By शेखर पाटील | Published: February 26, 2018 11:17 AM2018-02-26T11:17:52+5:302018-02-26T11:17:52+5:30
सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी एस ९ आणि गॅलेक्सी एस ९ प्लस या दोन उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सची घोषणा केली असून यात दर्जेदार कॅमेर्यांसह अनेक उत्तमोत्तम फीचर्स देण्यात आले आहेत.
सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी एस ९ आणि गॅलेक्सी एस ९ प्लस या दोन उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सची घोषणा केली असून यात दर्जेदार कॅमेर्यांसह अनेक उत्तमोत्तम फीचर्स देण्यात आले आहेत.
बार्सिलोना शहरात मोबाइल वर्ल्ड काँग्रेसच्या पहिल्याच दिवशी सॅमसंगने आपले दोन फ्लॅगशीप स्मार्टफोन सादर केेले. खरं तर गेल्या अनेक दिवसांमध्ये विविध लीक्सच्या माध्यमातून याच्या नावांसह अनेक फिचर्स आधीच जगासमोर आले होते. तथापि, यावर या कार्यक्रमात अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. सॅमसंग गॅलेक्सी एस ९ आणि एस ९ प्लस या दोन्ही मॉडेल्समध्ये अतिशय उत्तम दर्जाचे कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. यात वाढीव मेगापिक्सल्स वा लेन्सेस ऐवजी इमेजिंग क्षेत्रातील अद्ययावत फिचर्सवर भर देण्यात आल्याचे अधोरेखित झाले आहे. यातील गॅलेक्सी एस ९ या मॉडेलच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सल्सचा ड्युअल पिक्सल या प्रकारातील कॅमेरा आहे. यातील अपार्चर एफ/१.५ या क्षमतेचे आहे. हे अपार्चर डिजिटल पद्धतीनं एफ/२.४ पर्यंत वाढविता येते. म्हणजेच यात बदलणारे अपार्चर देण्यात आले आहे. यात कमी उजेड असल्यास एफ/१.५ अपार्चरने तर विपुल उजेडात एफ/२.४ अपार्चरने छायाचित्रे घेता येतात. विशेष बाब म्हणजे अपार्चरमधील हा बदल स्वयंचलीत पद्धतीनं होतो. तर एस ९ प्लस या मॉडेलमध्ये याच प्रकारातील दोन कॅमेरे आहेत. या दोन्ही मॉडेलमधील कॅमेरे सुपर स्लो-मोशन या प्रकारातील व्हिडीओ चित्रीकरण करण्यास सक्षम आहेत. यात ९६० फ्रेम्स प्रति-सेकंद इतक्या गतीने चित्रिकरण करण्यात येते.
यातील फुटेजला जीआयएफ अॅनिमेशनच्या स्वरूपात शेअर करण्याची अथवा वॉलपेपर म्हणून वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. गॅलेक्सी एस९ च्या कॅमेर्यात ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन हे फिचर दिले आहे. तर दोन्ही मॉडेल्सच्या कॅमेर्यांमध्ये ड्युअल पिक्सल्स ऑटो-फोकस, एलईडी फ्लॅश आदी फीचर्स दिलेले आहेत. तसेच या कॅमेर्यांमध्ये एआर इमोजी हे विशेष फिचर देण्यात आले आहे. यात युजरची थ्रीडी प्रतिमा घेऊन याला इमोजीमध्ये परिवर्तीत करण्याची सुविधा दिली आहे. सध्या १८ विविध एक्सप्रेशनच्या माध्यमातून या इमोजी तयार करता येतात. तर या कॅमेर्याच्या अॅपमध्ये बिक्सबी व्हिजन हे फिचर दिले आहे. याच्या अंतर्गत काढलेल्या प्रतिमांमधील विविध फलक तसेच अन्य शब्दांच्या अनुवादाची सुविधा दिली आहे. तर या दोन्ही मॉडेल्समध्ये ऑटो-फोकस आणि एफ/१.७ अपार्चरयुक्त ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस ९ आणि एस ९ प्लस या दोन्ही मॉडेल्समध्ये डॉल्बी अॅटमॉस या तंत्रज्ञानाने युक्त असणारे स्पीकर देण्यात आले आहेत. हे स्पीकर आधीच्या गॅलेक्सी एस ८ या मॉडेलपेक्षा १४ टक्क्यांनी वाढीव क्षमतेचा ध्वनी देण्यास सक्षम असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये अत्यंत गतीमान असा क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर असेल. दोन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉइडच्या ओरिओ या अद्ययावत प्रणालीवर चालणारे आहेत. दोन्हींचे व्हेरियंट ६४/१२८/२५६ या इनबिल्ट स्टोअरेजच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येतील. हे स्टोअरेज ४०० जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. हे स्मार्टफोन्स वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ आहेत. तर यात हेडफोन जॅकसह एनएफसी, ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, फोरजी-व्हिओएलटीई आदी फिचर्स असतील. तसेच यामध्ये आयरिस व फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेसियल रेकग्निशन या प्रणाली देण्यात आल्या आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी एस९ या मॉडेलमध्ये ५.८ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी प्लस या क्षमतेचा १८:५:९ अस्पेक्ट रेशो असणारा सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. याची रॅम ४ जीबी असून यात ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी एस९ प्लस या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी प्लस या क्षमतेचा १८:५:९ अस्पेक्ट रेशो असणारा सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. याची रॅम ६ जीबी असून यात ३,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
जागतिक बाजारपेठेत सॅमसंग गॅलेक्सी एस ९ या स्मार्टफोनचे मूल्य ७१९ डॉलर्स (सुमारे ४६,६०० रूपये) पासून तर गॅलेक्सी एस ९ प्लसचे मूल्य ८३९ डॉलर्सपासून (सुमारे ५४,४०० रूपये) सुरू होणारे आहे. पहिल्यांदा हे दोन्ही मॉडेल्स अमेरिकेसह अन्य देशांमध्ये लाँच करण्यात येणार आहेत. तथापि, भारतातही हे दोन्ही उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्स लवकरच सादर करण्यात येतील असे मानले जात आहे.
पाहा: सॅमसंग गॅलेक्सी एस ९ आणि एस ९ प्लसची माहिती देणारा व्हिडीओ