सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 मॉडेलच्या आगमनाचे संकेत
By शेखर पाटील | Published: July 18, 2018 02:35 PM2018-07-18T14:35:02+5:302018-07-18T14:35:08+5:30
सॅमसंग कंपनी लवकरच गॅलेक्सी टॅब एस४ हा टॅबलेट बाजारपेठेत उतरणार असून याचे सर्व फीचर्स विविध लीक्सच्या माध्यमातून समोर आले आहेत.
सॅमसंग कंपनी लवकरच गॅलेक्सी टॅब एस४ हा टॅबलेट बाजारपेठेत उतरणार असून याचे सर्व फीचर्स विविध लीक्सच्या माध्यमातून समोर आले आहेत. खरं तर स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा आकार वाढत असून यामुळे टॅबलेटची विक्री मंदावल्याचे दिसून येत आहे. तथापि, अजूनही चांगले फीचर्स असणार्या टॅबलेटला पसंती मिळत असते. या अनुषंगाने सॅमसंग कंपनी लवकरच गॅलेक्सी टॅब एस४ हे मॉडेल लाँच करणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर आलेली आहे.
ही कंपनी ९ ऑगस्ट रोजी आपला गॅलेक्सी नोट ९ हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. याच कार्यक्रमात अथवा यानंतर गॅलेक्सी टॅब एस४ हा नवीन टॅबलेट बाजारपेठेत लाँच करण्यात येईल अशी माहिती आता समोर आलेली आहे. याला ब्लॅक आणि ग्रे या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात येणार असून विविध लीक्सच्या माध्यमातून याचे फीचर्स जगासमोर आले आहेत. यानुसार यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेले नसेल. याऐवजी यात आयरिस स्कॅनरची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये 'एकेजी' या तंत्रज्ञानाने युक्त असणारी ऑडिओ सिस्टीम असल्यामुळे युजरला सुश्राव्य ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे. यात सॅमसंगच्या डेक्स या प्रणालीचा सपोर्ट दिलेला आहे. यामुळे हा टॅबलेट संगणकाला संलग्न करण्याची सुविधादेखील युजरला मिळणार आहे.
सॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ या मॉडेलमध्ये १०.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २५६० बाय १६०० पिक्सल्स क्षमतेचा सुपर अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १६:१० असा असणार आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८३५ हा प्रोसेसर असेल. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली असेल. यामध्ये १३ मेगापिक्सल्सचा मुख्य तर ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे असून यात ७,३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात येणार आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये वाय-फाय, ब्ल्यु-टुथसह युएसबी ३.१, जीपीएस आदी फिचर्स असणार आहेत. यावर स्टायलस पेनच्या सहाय्याने रेखाटनाची सुविधा दिलेली असेल.