सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्लस: ड्युअल कॅमेरा, अनेक सरस फिचर्स
By शेखर पाटील | Published: September 4, 2017 11:43 AM2017-09-04T11:43:58+5:302017-09-04T11:46:40+5:30
सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे ७ प्लस या स्मार्टफोनचे अनावरण केले असून यात ड्युअल कॅमेर्यासह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.
सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे ७ प्लस या स्मार्टफोनचे अनावरण केले असून यात ड्युअल कॅमेर्यासह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. सॅमसंग कंपनीने काही दिवसांपूर्वीच गॅलेक्सी नोट ८ या मॉडेलला लाँच केले आहे. यात पहिल्यांदाच ड्युअल कॅमेर्याचे फिचर देण्यात आले होते. आता सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्लसमध्येही हीच सुविधा देण्यात आली आहे.
अर्थात हा ड्युअल कॅमेरा असणारा सॅमसंगचा दुसरा स्मार्टफोन ठरला आहे. यात एलईडी फ्लॅशसह एफ/१.७ अपार्चरयुक्त १३ मेगापिक्सल्सचा मुख्य तर याच्या सोबत एफ/१.९ अपार्चरसह दुसरा कॅमेरा आहे. यातील एक कॅमेरा मोनोक्रोम तर दुसरा आरजीबी या प्रकारातील असेल. या दोन्ही कॅमेर्यांनी एकत्रीतपणे अतिशय उत्तम दर्जाचे छायाचित्र काढता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात प्रतिमांना बोके इफेक्ट देण्याची सुविधादेखील असेल. या दोन्ही कॅमेर्यातून काढलेल्या प्रतिमा या वन प्लस ५ आणि ऑनर ८ या मॉडेलप्रमाणे उत्तम दर्जाच्या असतील असे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एफ/१.९ अपार्चरसह १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्लस या मॉडेलमधील दुसरे महत्वाचे फिचर म्हणजे अल्वेज ऑन डिस्प्ले हे होय. यामुळे कुणीही युजरला नोटिफिकेशन पाहण्यासाठी आपल्या स्मार्टफोनच्या डिस्प्लेला सुरू करण्याची आवश्यकता नाही. हा डिस्प्ले ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा सुपर अमोलेड या प्रकारातील असेल. सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्लस या मॉडेलमध्ये ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ पी २० हा गतीमान प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्लसमध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. यात फिंगरप्रिंट स्कॅनर तसेच सॅमसंग कंपनीने विकसित केलेल्या बिक्सबी हा व्हर्च्युअल असिस्टंटही देण्यात आलेला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्लस हे मॉडेल सर्वात पहिल्यांदा थायलंडमधील ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. तथापि, येत्या काही दिवसांत हे मॉडेल भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात येईल असे मानले जात आहे. याचे भारतातील मूल्य २५ हजारांच्या आसपास राहू शकते.