अब्जावधी असेच मिळवून देणाऱ्या सॅमसंगने गुगलची साथ सोडली; Apple ही त्याच मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 02:09 PM2023-04-17T14:09:04+5:302023-04-17T14:11:03+5:30
जगभरात दबदबा असलेल्या सर्च इंजिन गुगलवर आता संक्रांत कोसळणार आहे. गुगलचे आता वाईट दिवस सुरु झाल्याचीच ही नांदी आहे.
जे हवे ते चुटकीसरशी तुमच्या समोर आणून हजर करणाऱ्या, जगभरात दबदबा असलेल्या सर्च इंजिन गुगलवर आता संक्रांत कोसळणार आहे. गुगलचे आता वाईट दिवस सुरु झाल्याचीच ही नांदी आहे. कारण काहीही न करता असेच अब्जावधी रुपये कमवून देणारी जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग आणि अॅपलने गुगलची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सॅमसंग आणि अॅपलच्या स्मार्टफोनवर बायडिफॉल्ट गुगल सर्च इंजिन दिले जात होते. यामुळे गुगलला यातून वर्षाला मोठी कमाई होत होती. परंतू आता मायक्रोसॉफ्टच्या एआय बेस्ड सर्च इंजिन Microsoft Bing चा बोलबाला सुरु झाल्याने गुगलची ही कमाई जाणार आहे. हे सर्च इंजिन गुगलपेक्षा चांगले आहे. यामुळे सॅमसंगने गुगलची साथ सोडून सर्व स्मार्टफोनमध्ये बिंग देण्याचा निर्णय घेतला आहे.
एकट्या सॅमसंगच्या स्मार्टफोनद्वारे गुगलला वर्षाला ३ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळत होते. यामुळे गुगलचे सर्वात मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचबरोबर जर अॅपलनेही बिंग सर्च इंजिन देण्यास सुरुवात केली तर गुगलचे हे नुकसान वाढून वर्षाला २० अब्ज डॉलरचे होणार आहे.
गुगलने काळाची पावले उचलून एआय बेस्ड सर्च इंजिनवर काम करण्यास सुरुवात केली आहे. परंतू, तोवर जर बिंगने बाजी मारली तर पुन्हा गुगलला आपला हिस्सा मिळविणे कठीण जाणार आहे. यासाठी गुगलने मॅगी या प्रोजेक्टवर काम सुरु केले आहे. गुललचा वर्षाचा एकूण व्यवसाय हा १६२ अब्जांचा होता. त्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.