मोबाईलसोबत मिळणारा चार्जर 'गायब' होणार?; सॅमसंग ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 04:04 PM2020-07-09T16:04:11+5:302020-07-09T16:04:47+5:30
सॅमसंग लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
नवी दिल्ली: स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रातील मोठी कंपनी असलेली सॅमसंग लवकरच ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. स्मार्टफोनसोबत मिळणारा चार्जर न देण्याचा निर्णय घेण्याबद्दल सॅमसंगकडून विचार सुरू आहे. त्यामुळे सॅमसंगच्या नव्या मोबाईलसोबत चार्जर न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सॅमसंगशी संबंधित माहिती देणाऱ्या सॅममोबाईल नावाच्या संकेतस्थळानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
सॅममोबाईलनं दिलेल्या वृत्तानुसार पुढील वर्षापासून काही स्मार्टफोनसोबत चार्जर न देण्याची योजना सॅमसंगकडून आखली जात आहे. सॅमसंगनं असा निर्णय घेतल्यास पहिल्यांदाच कंपनीचे फोन चार्जरशिवाय विकले जातील. यामागील विचार पूर्णपणे आर्थिक असल्याचं बोललं जात आहे. सॅमसंग जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन निर्मिती कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी दरवर्षी कोट्यवधी फोन्सची विक्री करते. या फोनसोबत चार्जर न दिल्यास कंपनीला आर्थिक फायदा होईल. त्यामुळे फोनची किंमत कमी होऊन त्याचा फायदा ग्राहकांना देता येईल, असा विचार कंपनीकडून सुरू आहे.
सध्या जगभरात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्सचे चार्जिंग पोर्ट्स जवळपास सारखेच असतात. सगळ्याच कंपन्या यूएसबी-सी पोर्ट चार्जिंग पोर्ट्सचे फोन तयार करतात. सॅमसंग याच मुद्द्याचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. चार्जरशिवाय फोन विकण्याच्या विचारात असलेली सॅमसंग ही पहिली कंपनी नाही. ऍपलकडूनही आयफोन १२ ची सीरिज चार्जरशिवाय बाजारात लॉन्च करण्याबद्दल विचार सुरू आहे.
बाजारातील बऱ्याचशा फोनचे चार्जिंग पोर्ट्स एकसारखेच असल्यानं एक चार्जर अनेक मोबाईलसाठी वापरला जाऊ शकतो. याचाच फायदा घेण्याचा विचार सॅमसंगकडून सुरू आहे. ऍपल आयफोन १२ सीरिज चार्जरशिवाय आणण्याच्या विचारात असल्यानं सॅमसंग कंपनीदेखील अशाच प्रकारचा निर्णय घेऊ शकते. हेडफोन जॅक नसलेल्या फोन्सची निर्मिती, फोन्ससोबत एअरफोन्स न देणं अशा निर्णयांच्या बाबतीत कंपन्यांनी एकमेकांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे.