सॅमसंग सादर करणार हायब्रीड स्मार्टवॉच
By शेखर पाटील | Published: August 8, 2017 01:57 PM2017-08-08T13:57:57+5:302017-08-08T13:58:09+5:30
सॅमसंग कंपनीने स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर यांचा संगम असणारे हायब्रीड स्मार्टवॉच सादर करण्याचे संकेत दिले असून येत्या काही दिवसांत याची अधिकृत घोषणा होऊ शकते.
सॅमसंग कंपनीने स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर यांचा संगम असणारे हायब्रीड स्मार्टवॉच सादर करण्याचे संकेत दिले असून येत्या काही दिवसांत याची अधिकृत घोषणा होऊ शकते.
सध्या वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्यायोग्य उपकरणांमध्ये अपेक्षित घडामोडी होत नाहीत. खरं तर काही वर्षांपूर्वीच स्मार्टफोनची जागा वेअरेबल्स घेतील अशी भाकिते करण्यात आली होती. मात्र सध्या तरी स्मार्टवॉच, फिटनेस बँड/ट्रॅकर आदींचा अपवाद वगळता अन्य कोणतीही उत्पादने बाजारपेठेत उपलब्ध नाहीत. स्मार्टवॉचचा विचार केला असता अॅपल, सॅमसंग, एलजी आदींसारख्या मातब्बर कंपन्यांपासून ते अनेक चीनी कंपन्यांनी विविध मॉडेल्स ग्राहकांना सादर केले आहेत. तर फिटनेस ट्रॅकरमध्ये फिटबीटसारख्या कंपन्या आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमिवर सॅमसंग कंपनीने वेअरेबल्समध्ये दमदार पाऊल टाकण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे.
सॅमसंग कंपनीने आपल्या आगामी प्रॉडक्टसाठी टॅगलाईनचा शोध सुरू केला आहे. या अनुषंगाने कंपनीच्या अनेक कर्मचार्यांना ई-मेल्स पाठविण्यात आले आहेत. यात आगामी प्रॉडक्टमध्ये गिअर जी ३ आणि गिअर फिट २ या दोन मॉडेल्सचा मिलाफ असेल असे नमूद करण्यात आले आहे. ही दोन्ही उपकरणे अनुक्रमे स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर या प्रकारातील असल्याने साहजीकच आगामी उपकरण हे हायब्रीड स्मार्टवॉच असेल असे मानले जात आहे. यात संबंधीत उपकरण हे वॉटरप्रूफ असून याच्या मदतीने अगदी नवशिक्या व्यक्तीपासून ते तज्ज्ञांना फिटनेसशी संबंधीत विविध बाबी उदाहरणार्थ वजन/कॅलरी व्यवस्थापन, विविध स्पोर्टस् अॅक्टीव्हिटीज आदींबाबत सखोल माहिती देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे हे हायब्रीड स्मार्टवॉच नेमके असेल तरी कसे आणि ते कधी सादर होणार ? याबाबत टेक्नोवर्ल्डमध्ये अतिशय औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले आहे.