सॅमसंगचा किफायतशीर मूल्यातला स्मार्टफोन
By शेखर पाटील | Published: August 29, 2018 11:22 AM2018-08-29T11:22:16+5:302018-08-29T11:24:18+5:30
सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी जे २ कोअर हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारला असून यात किफायतशीर मूल्यात उत्तम फीचर्सचा समावेश आहे.
सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी जे २ कोअर हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारला असून यात किफायतशीर मूल्यात उत्तम फीचर्सचा समावेश आहे. भारतीय बाजारपेठेत एंट्री लेव्हलचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात विकले जात असल्याची बाब आधीच स्पष्ट झाली आहे. या वर्गवारीत आधी भारतीय कंपन्या आघाडीवर होत्या. नंतर मात्र चिनी कंपन्यांनी यात जोरदार मुसंडी मारली आहे. सॅमसंगसारख्या कंपनीनेही आजवर मिड आणि लो रेंजमधील मॉडेल्स सादर केले आहेत. मात्र मध्यंतरी या कंपनीने मध्यम आणि उच्च श्रेणीवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून आले आहे. विशेष करून अलीकडेच सादर करण्यात आलेले गॅलेक्सी नोट ९ आणि गॅलेक्सी ए ८ स्टार हे मॉडेल्स उच्च श्रेणीतील आहेत. या पार्श्वभूमीवर, आता सॅमसंग गॅलेक्सी जे २ कोअर हे किफायतशीर मूल्यातील मॉडेल लाँच करण्यात आले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे मॉडेल अँड्रॉइड ओरियो (गो एडिशन) या आवृत्तीवर चालणारे आहे.
किफायतशीर मूल्यात अँड्रॉइडच्या अद्ययावत आवृत्तीचा वापर करण्यासाठी अँड्रॉइड गो उपयुक्त आहे. यात १ जीबी रॅमच्या स्मार्टफोन्सला अँड्रॉइडच्या ताज्या आवृत्तीवर चालण्यासाठी खास प्रकारे ऑप्टीमाईज्ड करण्यात आले आहे. या अनुषंगाने सॅमसंगनेही या प्रणालीवर चालणारा आपला पहिला स्मार्टफोन ग्राहकांना सादर केला आहे. याचे मूल्य ६,१९० रूपये असून याला गोल्ड, ब्ल्यू आणि ब्लॅक या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये सॅमसंग ई-शॉपीसह देशभरातील रिटेल शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी जे २ कोअर या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि ९६० बाय ५४० पिक्सल्स क्षमतेचा टिएफटी एलसीडी डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. एलईडी फ्लॅश आणि एफ/२.२ अपर्चरसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे.