सॅमसंगचा महत्त्वाकांक्षी गॅलक्सी 8 नोट भारतात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 02:24 PM2017-09-12T14:24:50+5:302017-09-12T14:24:50+5:30
अमेरिकत अॅपलचा आयफोन 8 लाँच होत असतानाच सॅमसंगने भारतात गॅलेक्सी नोट आणून अॅपलला एक मोठे आव्हानच उभे केले आहे. आयफोन 8 भारतात दाखल झाला आहे.
- आमोद काटदरे
नवी दिल्ली : मोबाइल विक्रीत भारतात आघाडीवर असलेल्या सॅमसंगने गॅलेक्सी नोट 8 हा बहुविध फीचर्स असलेला वरिष्ठ श्रेणीतील मोबाइल मंगळवारी नवी दिल्लीत सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अमेरिकत अॅपलचा आयफोन 8 लाँच होत असतानाच सॅमसंगने भारतात गॅलेक्सी नोट आणून अॅपलला एक मोठे आव्हानच उभे केले आहे. आयफोन 8 भारतात दाखल होण्यास थोडाच अवधी आहे. त्यातुलनेत दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सॅमसंग येथील बाजारपेठ काबीज करण्याचा तयारीत आहे.
नेहमीच्या स्क्रीनपेक्षा मोठा इनफिनिटी डिस्प्ले, एस पेन, मागील बाजूस वाइड अँगलचे दोन मोठे कॅमेरे, 6 जीबी रॅममुळे तगडी कार्यक्षमता आणि वायरलेस चार्जिंगची सुविधा, ही सॅमसंगच्या या बहुप्रतिक्षीत फोनची खास वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कंपनीने ‘डू बिगर थिंग्जस’ अशी टॅगलाइन या फोनसाठी वापरली आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 च्या तुलनेत हा फोन नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा कंपनीला आहे.
6.3 इंचीचा क्वॉड एचडी, अमोल्ड व इनफिनिटी डिस्प्ले असून 1440*2960 पिक्सेलचे रिसोल्यूशन आहे. 18.5: 9 रेशोच्या इनफिनिटी डिस्प्लेमुळे गॅलेक्सी नोट 5 च्या तुलनेत 14 टक्के मोठी स्क्रीन मिळणार आहे. 18.5: 9 रेशोच्या स्क्रीनमुळे एकाच वेळी दोन अॅप वापरता येणार आहेत. उदा. एका अॅपवर गाणी ऐकतानाच दुसऱ्या अॅपवर रेल्वेचे तिकीट आरक्षित करता येईल. मोठय़ा स्क्रीनमुळे गॅलरीतील फोटो पाहण्यासाठी सारखे वर-खाली स्क्रोल करण्याच्या त्रसातून सुटका होणार आहे. मिडनाइट डिस्प्ले आणि आणि मॅपल गोल्ड या दोन रंगामध्ये हा मोबाइल उपलब्ध होणार आहे.
एस पेन हे या फोनचे खास आकर्षण आहे. नेहमीच्या पेन सारखे दिसणा:या एस पेनला 0.7 एमएमची टीप अथवा नीब आहे. फोटोवर इमोजी काढणे किंवा एखादा संदेश लिहिणे, मार्किग अथवा रंगरंगोटी करणे, रेखाचित्र रेखाटणे, हाताने नोट्स लिहिणे त्याचबरोबर अॅनिमेटेड जीआयएफ बनवणे आदी करता येणार आहे. लांबलचक लेख, मेल अथवा अन्य डिजिटल स्वरूपाचा मजकूर वाचताना त्याच्या नोंदी करणेही या पेनमुळे शक्य होणार आहे. गॅलेक्सी नोट 8 फोनला 12 मेगापिक्सलचे दोन मुख्य कॅमेरे आणि सेल्फीसाठी पुढील बाजूस असलेला आठ मेगापिक्सलचा कॅमेरे आहेत. 2 एस ऑप्टीकल झूम व डय़ुएल ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनमुळे (आयओएस) लांबचे फोटो अधिक सुस्पष्टपणे टिपणे शक्य आहे. बोकेह इफेक्टमुळे लाइव्ह फोक्सद्वारे एकाद्या व्हिडीओमधील मागीलच चित्र ब्लर करून मुख्य व्यक्ती झूम करता येते. डय़ुएल कॅमेऱ्यामुळे अधिक वाइड फोटो काढता येणार आहेत. 12 मेगापिक्सल डय़ुएल पिक्सेल सेन्सर व एफ 1.7 ब्राइट लेन्समुळे रात्रीच्या वेळचे फोटोही अधिक चांगले येतील. एकदंरीतच यामुळे छायाचित्रणाचा पूर्ण आनंद लुटता येणार आहे.
10 नॅनोमीटर अॅप्लिकेशन प्रोसेसर आणि 64 जीबी रॅम, 1.6 गिगाहर्टझ ऑक्टाकोअर प्रोसेसर व स्नॅपड्रॅगन 835, यामुळे या फोनची कार्यक्षमता उत्तम आहे. अँड्रॉइड 7.1.1 या नोगट या आवृत्तीवर चालणारा हा फोन आहे. मात्र, वर्षाअखेरी तो अँड्रॉइड 8 ओरिओवरही अपग्रेड करता येणार आहे. या फोनमध्ये 3300 मिलीअँपिअरची बॅटरी आहे. 64 आणि 128 जीबी मेमरी अशा दोन प्रकारांचे फोन कंपनी बाजारात आणणार आहे. मात्र, मायक्रो एचडी कार्डद्वारे त्याची मेमरी 256 जीबीपर्यंत विस्तारता येणार आहे. हा फोन डय़ुएल सीम आहे. त्यात हायब्रीड सीम व मायक्रो सीमसाठी स्लॉट आहे. एचडी कार्डसाठी वापर करायचे झाल्यास मायक्रो सीम वापरता येणार नाही. वॉयरलेस चार्जिगची सुविधा असली तरी तो चाजर्र स्वतंत्ररित्या विकला जाणार आहे.
गोरिला ग्लासच्या पाच लेअरमुळे फोनचा स्क्रीनला स्क्रॅच येणार नाहीत. याशिवाय धूळ आणि पाण्यापासूनही फोन सुरक्षित राहणार आहे. विशेष म्हणजे बायोमॅट्रिक पद्धतीमुळे डोळ्य़ाचे बुबुळ, चेरा, हाताचे ठसे व्यतिरिक्त पॅटर्न लॉकने फोन लॉक-अनलॉक करता येतो.
अडीच लाख फोनची नोंदणी
देशभरात अडीच लाख सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 फोनची पूर्वनोंदणी झाल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. त्यातील दीड लाख नोंदणी ‘अॅमेझोन’वर नोंदवली गेली आहे. दरम्यान, जगभरात तीन लाख 95 फोनची नोंदणी झाली आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 ची नोंदणी 3 लाख 80 हजार इतकी होती. त्यामुळे नवीन फोनची 15 हजार अधिक नोंदणी झाल्याचे समजते.