SBI Netbanking चा वापर करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर होईल मोठं नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 12:23 PM2022-11-06T12:23:15+5:302022-11-06T12:23:40+5:30
SBI Netbanking/Mobile Banking सुविधा ग्राहकांना उपलब्ध झाली असली तरी यातून सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कधी कधी एक छोटीशी चूक देखील महागात ठरू शकते.
नवी दिल्ली-
SBI Netbanking/Mobile Banking सुविधा ग्राहकांना उपलब्ध झाली असली तरी यातून सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कधी कधी एक छोटीशी चूक देखील महागात ठरू शकते. अशावेळी नेटबँकिंग व्यवहार करताना खूप काळजी बाळगणं गरजेचं आहे. बँक देखील याबाबत ग्राहकांना वारंवार सावध करत असते. आपण अशाच काही सेफ्टी टिप्सबद्दल जाणून घेणार आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देखील त्यांच्या अधिकृत साइटवर या सुरक्षा टिप्स दिल्या आहेत.
SBI च्या वेबसाइटनुसार तुम्ही गुगलवर एसबीआय नेटबँकिंग साइट शोधत असाल तर तुम्ही अधिकृत साइट ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. कारण अनेक वेळा गुगलवर अनेक फेक साइट्स असतात आणि या साइट्सना तुमचा पर्सनल डेटा परवानगीशिवाय मिळतो. यामुळे तुमचे खूप नुकसान होऊ शकते. तसेच स्मार्टफोनवर कोणतेही अॅप डाउनलोड करणे टाळावे. अशी अॅप्स परवानगीशिवाय तुमचा मोबाइल डेटा घेतात.
ई-मेल बाबतही खूप काळजी घ्यावी लागते. काहीवेळा बँकांकडून मेल पाठवले जातात, परंतु काहीवेळा स्कॅमर देखील अशाच प्रकारचे मेल पाठवतात, ज्यामुळे मेल बँकेकडूनच पाठवला गेला आहे असा समज होतो. अशा परिस्थितीत, कोणताही विचार न करता युझर्स मेलला प्रतिसाद म्हणून त्यांचे बँक तपशील पाठवतात. पण बँक खात्यातून पैसे काढल्यावर त्याचा सर्वाधिक तोटा होतो. लक्षात ठेवा की बँक कधीही फोन आणि मेलद्वारे वैयक्तिक माहितीची विचारणा करत नाहीत.
SMSच्या बाबतीतही तेच आहे. एसबीआय किंवा कोणतीही बँक कधीही वैयक्तिक माहिती SMS द्वारे प्राप्त करत नाही. फोनवरही काही माहिती मिळाल्यास ती देऊ नये. अशा घोटाळ्यांमध्ये इंटरनेट बँकिंगच्या मदतीने पैसेही काढले जातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा कोणताही EMAIL/फोन/SMS आला तर तुम्ही कोणतेही उत्तर देऊ नये. यामुळे तुम्हाला मोठे नुकसान सहन करावं लागू शकतं.